पोहण्याचे तलाव, वॉशिंग सेंटर्सवर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 04:03 AM2018-10-31T04:03:21+5:302018-10-31T04:03:49+5:30

शहरातील महापालिकेचे पाणी वापरणारे पोहण्याचे तलाव तसेच वाहने धुण्याची केंद्रे दिवाळीनंतर बंद करण्यात येणार आहेत.

Swimming pools, congested at the washing centers | पोहण्याचे तलाव, वॉशिंग सेंटर्सवर संक्रांत

पोहण्याचे तलाव, वॉशिंग सेंटर्सवर संक्रांत

Next

पुणे : शहरातील महापालिकेचे पाणी वापरणारे पोहण्याचे तलाव तसेच वाहने धुण्याची केंद्रे दिवाळीनंतर बंद करण्यात येणार आहेत.
पुढील उन्हाळा संपेपर्यंत त्यांच्यावरची बंदी कायम असेल. खडकवासला धरणातून जलसंपदा महापालिकेला दिवाळीनंतर १ हजार १५० एमएलडीच पाणी देणार असल्याचे नक्की झाल्यामुळे महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पाणी कमी पडू नये यासाठी सर्व
प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

शहरात महापालिकेच्या मालकीचे पोहण्याचे तलाव आहेत. त्यांना महापालिकेचे पाणी द्यावे लागते. त्याशिवाय वाहने धुण्याची बरीच केंद्रेही आहेत. त्यांनाही महापालिकेचे पाणी दिले जाते. काही लाख लिटर्स पाणी यात जाते. ते वाचावे यासाठी तलाव व वॉशिंग सेंटर्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले.

शहरात ज्या भागात पाणी मिळत नाही तिथे महापालिकेकडून टँकरने पाणी दिले जाते. उपनगरांसाठी महापालिकेचे साधारण ३०० टँकर्स एरवीही सुरू असतात. त्यात आता वाढ झाली आहे. सध्या ४०० पेक्षा जास्त टँकर वापरले जात असून त्यातून काही भागांना पाणी दिले जात आहे. महापालिकेकडून विनामूल्य टँकर मिळत असल्याने नगरसेवकांनी महापालिकेकडून टँकर मिळवून द्यावेत यासाठी त्यांच्यावर नागरिकांचा दबाव वाढत आहे.

सध्या महापालिका १ हजार ३०० एमएलडी पाणी रोज घेत आहे. तरीही ते कमी पडत आहे व त्यामुळे नियोजन करण्याची वेळ आली आहे. त्याची नागरिकांनी सवय व्हावी यासाठीच पाणी एक वेळ करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनंतर धरणातून फक्त १ हजार १५० एमएलडीच पाणी देणार असे जलसंपदाने महापालिकेला लेखी कळवले आहे. तसेच त्यापेक्षा जास्त पाणी उचलल्याचे लक्षात आले तर यापूर्वी केली तशीच पंप बंद करण्याची कारवाई केली जाईल, अशी तंबीही दिली आहे. दिवाळीनंतर पाणी आणखीनच कमी होणार असल्याने आता वेगवेगळ्या उपायांद्वारे पाणी वाचवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोहण्याचे तलाव व वॉशिंग सेंटर्स बंद करण्याबरोबरच शहरातील पाण्याचे जुने स्रोतही शोधण्यात येणार असल्याची माहिती गेडाम यांनी दिली.

Web Title: Swimming pools, congested at the washing centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.