खराडीत डुकरांचा सुळसुळाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:11 AM2021-01-22T04:11:28+5:302021-01-22T04:11:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खराडी परिसरातील तुळजाभवानी नगर, बोराटे वस्ती, थिटे वस्ती, खराडी गावठाण, नदी पात्र आदी ठिकाणी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खराडी परिसरातील तुळजाभवानी नगर, बोराटे वस्ती, थिटे वस्ती, खराडी गावठाण, नदी पात्र आदी ठिकाणी डुकरांचा वावर वाढला आहे. नागरिकांच्या थेट घरात शिरून ही डुकरे धुमाकूळ घालू लागल्याने नागरिक घाबरले आहेत. वारंवार तक्रार करूनही महापालिका दखल घेत नसल्याने नागरिक संतापले आहेत.
खराडीत डुकरांची संख्या वाढली असून रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांसह, पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. डुकरांमुळे आमच्या मुलाबाळांचा जीव धोक्यात आला आहे. किती वेळा पालिकेच्या अधिकाऱ्यांना तक्रार करायची, एखाद्याचा जीव गेल्यावर पालिकेला जाग येणार आहे का, असे संतप्त प्रश्न नागरिक करु लागले आहेत.
थिटे वस्ती येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. येथील टाकीत काही दिवसांपूर्वी डुक्कर पडून मेल्याने दुर्गंधी पसरली. डुक्कर बाहेर काढण्यासाठी पालिकेचा कोणताही अधिकारी आला नाही. नागरिकांनी आयुक्तांना अनेकदा छायाचित्रे पाठवली त्यावर कारवाईचे आदेश देण्यावाचून काहीही झाले नाही.
वराह पालक महावीर ढिलोढ यांनी सांगितले की, खराडी गावठाणातील मुळामुठा नदी पात्रात वराह पालन केले जाते. कोरोनामुळे जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे त्यांचा वस्त्यांमधला वावर वाढला आहे. या व्यवसायावरच आमचा उदरनिर्वाह असून आमच्याही जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.