मोहननगरात एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यू
By Admin | Published: February 21, 2015 02:09 AM2015-02-21T02:09:32+5:302015-02-21T02:09:32+5:30
शहरामध्ये शुक्रवारी स्वाइन फ्लूने दोन बळी घेतले. दत्तात्रय नारायण नामदे (५९, रा. गवळीवाडा, मोहननगर, चिंचवड) यांचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला.
पिंपरी : शहरामध्ये शुक्रवारी स्वाइन फ्लूने दोन बळी घेतले. दत्तात्रय नारायण नामदे (५९, रा. गवळीवाडा, मोहननगर, चिंचवड) यांचा उपचारादरम्यान गुरुवारी रात्री मृत्यू झाला. त्यांना पाच ते सहा दिवस आधी ताप आला होता. मात्र, त्यावर प्राथमिक उपचार केले होते. मात्र, बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना चिंचवड येथील खासगी रुग्णालयात सायंकाळी दाखल केले. त्यांना न्यूमोनिया झाला होता. त्यातच त्यांना स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. त्याचा अहवाल शुक्रवारी आरोग्य विभागाला मिळाला.
शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून हलवणार होते. त्या वेळी कार्डिया रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास विलंब लागला. त्यानंतर त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयात हलवता आले नाही. ते टाटा मोटर्स कंपनीतून निवृत्त झाले होते. समाजातील विविध संघटनांवर ते पदाधिकारी म्हणून काम करत होते. त्यांना दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. (प्रतिनिधी)
अहिल्या किसन लोखंडे (५५, रा. मरकळ, ता. खेड ) यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे शुक्रवारी समजले. त्यांना मंगळवारी वायसीएममध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. बुधवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूची लक्षणे दिसून आल्यामुळे, त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविले. त्याचा अहवाल शुक्रवारी सायंकाळी मिळाल्याने त्यांचा मृत्यू स्वाइन फ्लूने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आजाराचे निदान लवकर न झाल्यामुळे त्यांना उपचारही मिळाले नाही. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला.