स्वाइन फ्लू, डेंगी यांचे थैमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 02:13 AM2018-08-30T02:13:16+5:302018-08-30T02:13:43+5:30
प्रतिबंधक उपाययोजना : सरकारी, खासगी दवाखान्यांत गर्दी
कर्वेनगर : मावळेआळीमध्ये साथीचा आजारांनी थैमान घातले असून या ठिकाणी अनेक नागरिक आजारी पडले आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी दवाखान्यात नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. पालिका आरोग्य विभागाने अनेक ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट केली नाहीत. या कारणाने साथीचे आजार वाढले गेले आहेत. यावर प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पतितपावन संघटनेचे मजदूर माथाडी कामगार संघटना अध्यक्ष राजेश मकवान यांनी केली आहे.
काही आठवडे झाले सतत पाऊस पडत आहे. कचरा कुजलेल्या स्थितीत असल्याने सर्वच ठिकाणी दुर्गंधी पसरली असून पालिका साफसफाई करत आहे की नाही, याबाबत शंका येते. कर्वेनगरमध्ये मावळेआळी, आकाश मित्र मंडळाजवळ, गोसावी वस्ती, कामना वसाहत, वनदेवी वसाहतीजवळ अनेक ठिकाणी डांसाची उत्पत्तीस्थळे निर्माण झाली आहेत. त्यामुळे या स्थळांचा परिसरात आजार वाढले आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी नुकताच पालिकेला डेंगी, मलेरिया, स्वाइन फ्लू याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमे वापरली गेली पाहिजेत; पण आरोग्यमंत्र्यांचा आदेशाची अंमलबजावणी होणार का? हा प्रश्न उपस्थित होतो. या ठिकाणी २५-३० लोकांना डेंगीची लागण झाली असून ते खासगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. काहीच प्रकृती चिंताजनक असून काहीची स्थिर आहे. दरम्यान, वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत हा प्रभाग येत असून तेथे औषधफवारणी करावी, डबकी नष्ट करावीत, पालिकेच्या दवाखान्यात औषधे सहज उपलब्ध व्हावीत अशा नागरिकांच्या मागण्या आहेत.
पालिका आरोग्य विभाग साथीचा आजारांबाबत जनजागृती करीत आहे. औषधफवारणी नियमित होऊन लवकरच डबकी नष्ट करण्यात येतील. - दौलत चोपडे,
हिवताप निरीक्षक