स्वाईन फ्लू वाढता वाढता वाढे..! पुण्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू; २० रुग्ण व्हेंटिलेटवर

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: August 26, 2022 08:29 PM2022-08-26T20:29:22+5:302022-08-26T20:29:29+5:30

चार हजार नमुन्यांपैकी २३ ऑगस्टपर्यंत 617 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले

Swine flu is increasing and increasing treatment of 231 patients started in Pune 20 patients on ventilator | स्वाईन फ्लू वाढता वाढता वाढे..! पुण्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू; २० रुग्ण व्हेंटिलेटवर

स्वाईन फ्लू वाढता वाढता वाढे..! पुण्यात २३१ रुग्णांवर उपचार सुरू; २० रुग्ण व्हेंटिलेटवर

googlenewsNext

पुणे: काेराेनाचे रुग्ण कमी हाेत असले तरी स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांची संख्या हळू हळू वाढतच आहे. तीन वर्षांनंतर शहरात स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या शहरात २३१ रुग्णांवर उपचार सुरू असून, २० रुग्ण व्हेंटिलेटवर आहेत. दरम्यान, शहरातील ११ व शहराबाहेरील १४ अशा एकूण २५ रुग्णांचा शहरातील रुग्णालयात उचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यामुळे नागरिकांनी घाबरू नये, मात्र सतर्कता बाळगून लक्षणे जाणवल्यास वेळेत उपचार घ्यावेत, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.

शहरात यावर्षी 8 हजार 268 संशयित रुग्णांची तपासणी केली असता त्यापैकी 4109 संशयित जणांना टॅमी फ्लू देण्यात आले. तसेच चार हजार नमुन्यांपैकी २३ ऑगस्टपर्यंत 617 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहे. तर 617 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 361 जणांवर यशस्वी उपचाराअंती त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर २३१ रुग्णांवर उपचार सूरू असून २० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर व्हेंटिलेटवर उपचार सूरू आहेत.

सहव्याधी असलेल्यांना धाेका अधिक

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक यांना स्वाइन फलू ची बाधा हाेते. तर, ज्येष्ठ नागरिक ज्यांना उच्च रक्तदाब व मधुमेह आहे अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांचा मृत्यू अधिक हाेताे असेही आराेग्य विभागाच्या मृत्यू विष्लेषन अहवालात आढळून आलेले आहे. एकुण मृत्यूपैकी ७५ टक्के मृत्यू हे सहव्याधी असलेल्या रुग्णांचे हाेत असल्याने त्यांनी अधिक काळजी घ्यावी, असे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.

अतिजोखमीच्या व्यक्ती

- ५ वर्षाखालील मुले, ६५ वर्षावरील प्रौढ व्यक्ती
- पूर्वीचे जुनाट आजार असलेल्या व्यक्ती जसे दमा, हदयाचे आजार, मूञपिंडाचे विकार, मधुमेह, यकृताचे विकार, रक्त अथवा चेतासंस्थेचे विकार
- औषधे/ आजारामुळे प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती व एचआयव्ही बाधित रुग्ण, गरोदर माता, स्थूल व्यक्ती इत्यादी.

प्रसाराचे माध्यम

हा विषाणूमुळे होणारा आजार असून तो मुख्यत्वे हवेवाटे पसरतो. आजारी व्यक्तीच्या शिंकण्या - खोकण्यातून उडणा-या थेंबावाटे या आजाराचे विषाणू एका रुग्णापासून इतर नि रोगी व्यक्तीकडे पसरतात. तर लागण झाल्यापासून १ ते ७ दिवसांत लक्षणे दिसून येतात.

लक्षणे

ताप, डोकेदुखी, अंगदुखी, घसादुखी, खोकला, थकवा. लहान मुलांमध्ये उलटी व जुलाब

निदान

रूग्णाच्या घशातील स्त्रावाचा नमुना घेणे आवश्यक असते. या आजारावर ऑसेलटॅमीवीर व झानामीवीर ही औषधे गुणकारी आहेत.

लसीकरण

- इंजेक्शनव्दारे आणि नाकातून स्प्रे स्वरूपात देण्याची लस उपलब्ध आहे.

प्रतिबंधात्मक उपाय :

वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा. पौष्टिक आहार घ्या. लिंबु, आवळा, मोसंबी, संञी, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा. धुम्रपान टाळा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. भरपूर पाणी प्या.

हे करु नकाः 

हस्तांदोलन, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका. डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका. आपल्याला फल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.

Web Title: Swine flu is increasing and increasing treatment of 231 patients started in Pune 20 patients on ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.