राज्यात स्वाइन फ्लूचा पुन्हा उद्रेक, आठ दिवसांत २६ बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 04:14 AM2018-09-23T04:14:19+5:302018-09-23T04:14:35+5:30
राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे.
पुणे : राज्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. शनिवारपर्यंत राज्यात ८२ जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये पुणे व नाशिक जिल्ह्यातील रुग्ण अधिक आहेत. रविवारी गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे गर्दी होईल, त्यामुळे स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी बाहेर जाणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जुलैपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. १४ सप्टेंबरपर्यंत राज्यात ५६ जणांचा मृत्यू झाला होता. मागील आठ दिवसांतच आणखी २६ जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ८२ वर पोहोचला आहे. राज्यातील विविध रुग्णालयांमधील उपचार घेत असलेल्या तसेच व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या जास्त आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये २६ तर पुणे जिल्ह्यात २८ जणांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला आहे. निम्म्यापेक्षा जास्त मृत्यू या दोन जिल्ह्यांतच झाले आहे. नाशकात तर १ हजार ९४९ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. ३३५ अतिगंभीर रुग्णांपैकी २६ जणांना प्राण गमवावे लागले. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांत स्वाइन फ्लूच्या दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात प्रत्येकी ९ तर सातारा जिल्ह्यात ७ जणांचा बळी गेला आहे.
विसर्जन मिरवणुकीत काळजी घ्या
गणेश विसर्जनामुळे रविवारी सर्वत्र मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे सर्दी, ताप अशी स्वाइन फ्लूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी घरीच थांबावे, असे आवाहन डॉ. प्रदीप आवटे यांनी केले.