नीरेत स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 02:05 AM2018-09-19T02:05:40+5:302018-09-19T02:05:58+5:30
पुरंदर तालुक्यात तीन रुग्ण पॉझिटिव्ह; आरोग्य विभाग संथच
नीरा : येथे स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून नीरा व परिसरात वातावरणातील बदलामुळे दिवसेंदिवस व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नीरा व परिसरात खोकला, सर्दी, ताप यांसारखे व्हायरल इन्फेक्शन झालेल्या रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी दवाखाने व सरकारी दवाखान्यांमध्ये रुग्णांची वाढती संख्या आहे. तसेच ग्रामीण भागातील नीरासारख्या गावातही स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील पुणे, नाशिक यांसारख्या मोठ्या शहरांत स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळत असून, ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूने आपले रौद्ररूप दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य विभागाच्या यंत्रणेने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
दरम्यान, शासन सर्वसामान्य नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. परंतु नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून नीरा गावात व्हायरल इन्फेक्शनच्या साथीवर नियंत्रण व जनजागृती करण्याकरिता उपाययोजना केली जात नसल्याचे व वैद्यकीय अधिकारी वेळेवर हजर राहत नसून अतितातडीच्या रुग्णांना तातडीने उपचार करण्यास विलंब होत असल्याच्या तक्रारी रुग्ण करीत आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाºयांनी नीरा आरोग्य केंद्राच्या कारभाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.
पुरंदर तालुक्यात आतापर्यंत तीन रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आहे. नीरा, माळशिरस, वाघापूर, पिंपरे या गावांतून स्वाइन फ्लूसदृश आजाराचे रुग्ण आढळले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात या संदर्भात लागणारी औषधे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लोकांनी तिथे उपचार घ्यावेत. तसेच गावातून सर्व्हे करण्यात येत आहे. संशयित रुग्ण आढळल्यास उपचार करण्यात येत आहेत. आजाराबाबत जागृती करणारी पत्रकेही वाटण्यात येत आहेत. लोकांनी घाबरून न जाता उपचार करून घ्यावेत. प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छता ठेवावी. आवश्यकता नसेल तेव्हा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी आणखी एक वैद्यकीय अधिकारी देण्यात येईल.
- अभय तिडके, तालुका वैद्यकीय अधिकारी
नीरा गावात पाळीव डुकरे मोकाट फिरत असतात. त्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचे विषाणू पसरतात. विषाणूंमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असतानाच स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण आढळू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक नाराज झाले आहेत.
पाळीव डुकरे व भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन मात्र याबाबत कोणतीही कारवाई करीत नाही.