स्वाइन फ्लूच्या संशयितांची गर्दी

By admin | Published: February 22, 2015 12:29 AM2015-02-22T00:29:40+5:302015-02-22T00:29:40+5:30

स्वाइन फ्लूने शहरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या आजाराचे संशयित रुग्ण पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाकडे धाव घेत आहेत.

Swine flu suspects | स्वाइन फ्लूच्या संशयितांची गर्दी

स्वाइन फ्लूच्या संशयितांची गर्दी

Next

पुणे : स्वाइन फ्लूने शहरात धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या आजाराचे संशयित रुग्ण पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असून, त्यांना संभाळण्यासाठी व्यवस्था तोकडी पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे रुग्णांची फरफट होत आहे. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णांची गर्दी होत असतानाही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची मात्र रुग्णालयामध्ये वानवा असल्याचे दिसून आले आहे.
सन २००९ व २०१० या वर्षांमध्ये पूर्ण पुण्याला हदरवून टाकणाऱ्या स्वाइन फ्लूने पुण्यात पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत तब्बल २१ जणांचा या आजाराने बळी घेतला आणि २३६ जणांना याची लागण झाली. हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सांसर्गिक आजारासाठी पुणे महापालिकेचे शहरात एकमेव डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालय आहे. त्यामुळे शहरातील खासगी डॉक्टर, पालिकेच्या दवाखान्यातील डॉक्टर, रुग्णांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे दिसताच त्यांना डॉ. नायडू रुग्णालयात जाण्यास सांगत आहेत. त्यामुळे सकाळपासून नायडू रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, ही गर्दी संभाळण्यासाठी तिथे अगोदरपासून असलेले तोकडे कर्मचारीच आहेत. त्यामुळे रुग्णांना योग्य माहिती मिळत नसल्याने त्यांची फरफट होत आहे.
रुग्ण आल्यानंतर त्यांना लगेचच माहिती मिळत नसल्याने ते काही काळ ताटकळत राहतात. कर्मचारी त्यांना माहिती न देता ओरडत असल्याचे चित्र आहे. याबरोबर रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयात जास्त कर्मचारी, डॉक्टर संख्या ठेवणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात असे कोणतेही चित्र रुग्णालयात नाही. एक-दोन डॉक्टरच येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला तपासत आहेत. तर औषधे देण्यासाठीही पुरेसे मनुष्यबळ नसल्याने रुग्णांना रांगा लावून उभे राहावे लागत आहे. यामुळे व्यवस्थेवर मोठा ताण येत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)

मास्क मागितल्याशिवाय मिळतच नाहीत
नायडू रुग्णालयात स्वाइन फ्लूच्या रुग्णांवर उपचार होत असल्याने तिथे येणाऱ्या संशयित व नॉर्मल रुग्णांना त्याची लागण होऊ नये म्हणून त्यांनी मास्क लावणे अत्यावश्यक आहे. मात्र रुग्णालयात मास्क देण्याची कोणतीही व्यवस्थाच नाही. कोणी मास्क मागितला तरच कर्मचारी तो देत असल्याचे चित्र रुग्णालयात आहे. यामुळे तिथे येणाऱ्या नॉर्मल रुग्णांनाही स्वाइन फ्लू जडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कर्मचारी वाऱ्यावर
डॉ. नायडू रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वाइन फ्लूची लागण होऊ नये म्हणून कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. त्यांना अत्याधुनिक मास्कही उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे रुग्णालयात असलेले साधे मास्क काही कर्मचारी लावून बसतात. मात्र त्या व्यतिरिक्त अनेक कर्मचारी विनामास्कचे काम करीत असल्याचे चित्र आहे. यावरून तिथे काम करणारे कर्मचारी वाऱ्यावर असल्याचे स्पष्ट होत आहे.

लहान मुलांची अवस्था दयनीय
डॉ. नायडू रुग्णालयात स्वाइन फ्लू संशयित लहान मुलांची अवस्था दयनीय आहे. सर्दी-खोकला, तापाने अगोदरच त्रासलेल्या या लहान मुलांना तपासण्यासाठी वेगळ्या डॉक्टरची, बालरोगतज्ज्ञाची व्यवस्थाच नसल्याचे चित्र आहे. लहान मुलांची प्रतिकारक्षमता कमी असल्याने त्यांना हा आजार तातडीने जडण्याची भीती असल्याने त्यांना त्वरित मास्क देण्याची कोणतीही व्यवस्था रुग्णालयात नाही.

Web Title: Swine flu suspects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.