स्वाइन फ्लूचा तिसरा बळी
By Admin | Published: February 7, 2015 12:55 AM2015-02-07T00:55:44+5:302015-02-07T00:55:44+5:30
शहरात शुक्रवारी आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. नीलेश देशपांडे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) असे मृताचे नाव आहे.
पिंपरी : शहरात शुक्रवारी आणखी एका रुग्णाचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. नीलेश देशपांडे (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) असे मृताचे नाव आहे. थेरगाव येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना २६ जानेवारीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यांचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या वर्षात स्वाइन फ्लूमुळे तिसरा बळी गेला आहे.
शहरातील पाच जणांना या आजाराची लागण झाली आहे. १८ रुग्णांमध्ये ही लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. एक रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. सहा जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. १ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत २४२ संशयित रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
कृष्णाकुमारी (रा. आंध्र प्रदेश) यांचा मोशी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी मुत्यू झाला. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे आढळले. यापूर्वी जानेवारी महिन्यात पिंपळे गुरव येथील एकाचा या आजाराने मृत्यू झालेला आहे. तर गतवर्षी या आजाराने चार जणांचा बळी घेतला होता. मृत्यू झालेल्या रुग्णामध्ये दोन रुग्ण पालिका हद्दीबाहेरील आहेत. तर एक रुग्ण पालिका हद्दीतील आहे. (प्रतिनिधी)
काय दक्षता
घ्यायला हवी
४नागरिकांनी हातांची स्वच्छता राखावी
४सार्वजनिक ठिकाणी मास्क व अन्य सुरक्षासाधने वापरावीत
४पुरेशी झोप व विश्रांती घ्या
४भरपूर पाणी प्यावे
४हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा.
वैद्यकीय विभागातर्फे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये टॅमीफ्ल्यू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांनी याबाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. वातावरण थंड असल्यामुळे फ्लूचे प्रमाण वाढण्यास मदत होत आहे. पालिकेच्या वतीने सर्व उपाययोजना सुरू आहेत.-डॉ. पवन साळवे,
अतिरिक्त आरोग्य
वैद्यकीय अधिकारी
स्वाइन फ्लूची लक्षणे
सर्दी, खोकला, ताप, घसा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, वांती, जुलाब अशी लक्षणे स्वाईन फ्लूमध्ये दिसून येतात. लागण झाल्यास तत्काळ वैद्यकीय उपचार घ्यावेत.