उरुळी कांचन येथे एकावर तलवारीने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:10 AM2021-07-20T04:10:24+5:302021-07-20T04:10:24+5:30
रामदास रघुनाथ आखाडे (वय ३८, रा. जावजीबुवाची वाडी, ता. दौंड जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. त्यांचे भाऊ संतोष ...
रामदास रघुनाथ आखाडे (वय ३८, रा. जावजीबुवाची वाडी, ता. दौंड जि. पुणे) हे जखमी झाले आहेत. त्यांचे भाऊ संतोष रघुनाथ आखाडे (वय ४७) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. ही घटना रविवारी (दि. १८) रात्री ८.४५ च्या सुमारास घडली. आखाडे बंधू यांचे उरुळी कांचन येथील खेडेकर मळ्यात पुणे-सोलापूर महामार्गालगत गारवा नावाचे हॉटेल आहे. हॉटेलचा व्यवसाय रामदास व भानुदास हे पाहतात. रविवारी नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये पार्सल सुविधा सुरू असताना रात्री ८.४५ च्या सुमारास संतोष आणि रामदास आखाडे दोघे हॉटेलमध्ये असताना रामदास यांना कोणाचा तरी फोन आल्याने ते हॉटेलबाहेर जाऊन खुर्चीवर फोनवर बोलत होते. या वेळी एक अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आला. त्याने आणलेल्या तलवारीने रामदास आखाडे यांच्या डोक्यात जोरदार वार केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे हॉटेलसमोर आरडाओरडा झाला. हे ऐकून संतोष आखाडे बाहेर आले. आरोपी हा महामार्ग ओलांडून उरुळी कांचनकडे जाणाऱ्या रस्त्यावर पलीकडे पळताना त्यांना दिसला. काहींनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तलवारीचा धाक दाखवला. या वेळी तेथे त्याचा दुसरा साथीदार त्याची वाट पाहत होता. त्याच्या दुचाकीवर बसून आरोपी फरार झाला. अंधार असल्याने दुचाकीचा नंबर कळू शकला नाही. ही घटना हॉटेलच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली आहे. झालेल्या वारामुळे रामदास यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. यांमुळे त्यांना पुढील उपचारासाठी संतोष व भानुदास आखाडे यांनी लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.