पुणेकरांवर निर्बंधांची पुन्हा टांगती तलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:09 AM2021-06-26T04:09:56+5:302021-06-26T04:09:56+5:30
पुणे : राज्य शासनाने लॉकडाऊनबाबतचा नवा आदेश शुक्रवारी जारी केल्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. पुण्यात सकाळी झालेल्या बैठकीत गृहमंत्री ...
पुणे : राज्य शासनाने लॉकडाऊनबाबतचा नवा आदेश शुक्रवारी जारी केल्यानंतर संभ्रम निर्माण झाला आहे. पुण्यात सकाळी झालेल्या बैठकीत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आताचेच निर्बंध कायम असतील असे स्पष्ट केले होते. त्यानंतर, पालिका प्रशासनाकडूनही नियमात कोणताही बदल नसल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी राज्य शासनाचे आदेश आल्याने त्यानुसार नियमात बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत आदेशाबाबत कोणतीही स्पष्टता नव्हती.
राज्य शासनाने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार दुकानांच्या आणि हॉटेल, रेस्टॉरंटच्या वेळा बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे व्यापारीवर्गामधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर सुरुवातीला दुपारी चारपर्यंतची मुभा दिली होती. या काळात दुकाने उघडण्यास आणि हॉटेलमध्ये बसून जेवण्यास परवानगी दिली होती. पॉझिटिव्हिटी रेट आणखी कमी झाल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुन्हा दुकानाच्या वेळा संध्याकाळी सातपर्यंत वाढविल्या होत्या. तर, हॉटेल-रेस्टॉरंट-बार रात्री दहापर्यंत उघडे ठेवण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे नागरिक आणि व्यापारीवर्ग काही काळ सुखावला होता. परंतु, राज्य शासनाने एक ते चार लेव्हलची पुनर्रचना केली आहे. त्यामुळे हा संभ्रम वाढला आहे.
राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे नवीन नियम शनिवारी जारी केले जाणार असल्याचे सांगितले. तूर्तास पुणे शहरात शनिवार-रविवार लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शनिवारी याबाबत पुणे महापालिकेकडून नव्या निर्बंधांबाबत सविस्तर आदेश काढण्यात येणार आहेत.
---/-/---
नवीन निर्बंधांमुळे व्यापारीवर्गात अतिशय निराशा निर्माण झाली आहे. अचानक झालेले हे बदल अर्थचक्राची नुकतीच सुरु होत असलेली गती मंद करतील. दुकाने हळूहळू सुरू होत होती. व्यापारातील उलाढाल कमी झालेली असली तरीही व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे चक्र फिरू लागले होते. बाजारात आर्थिक उलाढाल सुरु होण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, या नव्या निर्बंधांमुळे पुन्हा व्यवसाय बंद पडण्याची भीती आहे. आर्थिकदृष्ट्या विचार केला तर हे निर्बंध व्यापारीवर्गाला मोठा आर्थिक फाटा देणारे आहेत. दुकानांच्या वेळा सतत बदलत राहिल्या तर ते व्यापारासाठी चांगले नाही.
- महेंद्र पितळीया,
सचिव, पुणे व्यापारी महासंघ
-----
आता पुन्हा नवीन नियम लागू केले आणि वेळा कमी केल्या तर आमचा सर्व व्यवसाय मोठ्या नुकसानीत जाईल. आम्ही विमान आणि रेल्वेने कामगार आणले आहेत. दैनंदिन खर्चही मोठा आहे. मुख्य ग्राहक संध्याकाळनंतर असतो. शासनाने जर नियमांमध्ये धरसोडपणा केला तर व्यापारी आणि व्यावसायिकांनी जगायचे कसे, असा प्रश्न आहे. शासनानेही संवेदनशीलपणे विचार करायला हवा. गृहमंत्र्यांच्या बैठकीवेळी आम्हाला एक आठवडा नियम लागू करणार नसल्याचे आश्वस्त करण्यात आले होते.
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे हॉटेलियर्स संघटना