राजकीय पक्षाचे चिन्ह, तुतारी व्यवसायावर गंडांतर! अन्य पक्ष, आयोजकांकडून निमंत्रण न मिळण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 10:59 AM2024-02-26T10:59:58+5:302024-02-26T11:00:18+5:30

राष्ट्राभिमान जागविणारी तुतारी राजकीय पक्षाचे चिन्ह झाल्याने तुतारी वाजविणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायावर गंडांतर येण्याची भीती वाटत आहे...

Symbol of a political party, controversy over Trumpet business! Possibility of not getting invitation from other parties, organizers | राजकीय पक्षाचे चिन्ह, तुतारी व्यवसायावर गंडांतर! अन्य पक्ष, आयोजकांकडून निमंत्रण न मिळण्याची शक्यता

राजकीय पक्षाचे चिन्ह, तुतारी व्यवसायावर गंडांतर! अन्य पक्ष, आयोजकांकडून निमंत्रण न मिळण्याची शक्यता

पुणे : तुतारीला ऐतिहासिक महत्त्व असून ती मराठी संस्कृतीचे प्रतीक आहे. यामुळे आपली संस्कृती, परंपरेचे प्रदर्शन करण्यासाठी शासकीय कार्यक्रमात व लग्नकार्यात तुतारी वाजवलेली आपण ऐकतो आणि तिच्या आवाजाने अंगावर रोमांच उभे राहतात. राष्ट्राभिमान जागविणारी तुतारी राजकीय पक्षाचे चिन्ह झाल्याने तुतारी वाजविणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायावर गंडांतर येण्याची भीती वाटत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै २०२३ रोजी फूट पडली. यातून अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले. निवडणूक आयाेगाने अजित पवार यांच्या गटाला मूळ पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले, तर शरद पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे नाव आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह देण्यात आले आहे.

अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात तसेच राजकीय कार्यक्रमात पाहुण्यांचे आगमन तुतारीच्या घोषाने करण्याचा रिवाज आहे. विशेषत: हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यक्रमात तर तुतारी हमखास असते. कार्यक्रमामध्ये पुरस्कार देताना पार्श्वभूमीवर तुतारीचे वादन असेल तर त्या मान्यवरालाही आपला यथोचित गौरव झाल्याचा अभिमान वाटतो. त्याचवेळी कार्यक्रमाची उंचीही वाढते. पण, आता असे तुतारी वादन झाले तर आपल्याकडून त्या राजकीय पक्षाचा प्रचार तर होणार नाही ना, अशी शंका नेहमी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करणाऱ्यांच्या मनात येऊ लागली आहे.

पारंपरिक वाद्य वादक शंकर कसबे म्हणाले, सर्व राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आम्हाला तुतारी वाजवण्यासाठी बोलावले जाते. या कार्यक्रमातून जेमतेम उदरनिर्वाहाइतके पैसे आम्हाला मिळतात. माझी पाचवी पिढी पारंपरिक वाद्य वाजवण्याचा व्यवसाय करत आहे.

आमच्या उदरनिर्वाहाचे साधन हे वाद्यच आहेत. पारंपरिक पेहराव ज्यामध्ये पायजमा, पटका, मऱ्हाटी सदरा परिधान केला जातो. तुतारी फुंकताना प्राण फुंकून ती वाजवावी लागते. फुप्फुसाची सगळी प्रसरण क्षमता वापरून, त्यातली अधिकतम हवा विशिष्ट गतीने तुतारीच्या मुखातून आत सोडावी लागते. त्यासाठी छातीचे स्नायू, गालाचे स्नायू या सगळ्यांवर खूप ताण येतो. जेवढा वेळ नाद करायचा आहे, तेवढा वेळ श्वास बंद राहतोच पण डोक्याकडून हृदयाकडे जाणारे नीलांमधील रक्तवहनही थांबते. असे असताना एका पक्षाला राजकीय चिन्ह मिळाल्यामुळे आम्हाला इतर राजकीय पक्ष त्यांच्या कार्यक्रमांमध्ये बोलावण्याचे टाळणार तर नाहीत ना, अशी भीती ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमांमध्ये वाजवली जाते तुतारी

लग्न समारंभ, साखरपुडा, सांस्कृतिक कार्यक्रम, राजकीय पक्षाचे कार्यक्रम, उद्घाटन समारंभ अशा विविध कार्यक्रमात तुतारी वादनासाठी बोलावले जाते.

तुतारीचे ऐतिहासिक महत्त्व

तुतारीच्या वापर महाराष्ट्रावर राजे राज्य करत होते त्या काळापासूनचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात तुतारीला अधिक महत्त्व प्राप्त झाले. तुतारीचा उपयोग राजे किंवा राजघराण्यातील सदस्यांच्या आगमनाची घोषणा करण्यासाठी केला जात होता. तुतारी ही महाराष्ट्रातील पालखी परंपरेचा अविभाज्य भाग आहे. यामुळेच महाराष्ट्र शासनाने मराठी संस्कृतीचे एक प्रतीक म्हणून तुतारी स्वीकारली आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात साधारण १५० ते २०० तुतारी व पारंपरिक वादक आहेत. त्यांच्या व्यवसायावर निवडणूक आयोगाच्या निर्णयाने परिणाम होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक महिन्यामध्ये किंवा नेहमी कार्यक्रम असेल आणि आम्हाला बोलावतीलच याची शाश्वती नाही. यामुळे महिन्याला साधारण १५ हजार रुपयांपर्यंत पैसे मिळतात. कुटुंबातील सर्व व्यक्ती याच व्यवसायात असल्यामुळे उत्पन्नाचे दुसरे साधन आमच्याकडे नाही. यावरच आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.

- शंकर कसबे, पारंपरिक वाद्य वादक

Web Title: Symbol of a political party, controversy over Trumpet business! Possibility of not getting invitation from other parties, organizers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.