खडकीत सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By admin | Published: May 7, 2017 02:19 AM2017-05-07T02:19:48+5:302017-05-07T02:19:48+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा जाहीर निषेध करीत खडकी येथे आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
मंचर : केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा जाहीर निषेध करीत खडकी येथे आंबेगाव येथील शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलन केले. सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. शेतकऱ्यांची कर्जे माफ करा, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.
सकाळी शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले होते. केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत आंदोलन केले. कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकरी सहभागी झाले होते. त्यांच्या हातात फलक होते. शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, कृषिपंप वीजबिल माफी झालीच पाहिजे, कृषिपंपांना २४ तास वीज मिळालीच पाहिजे, शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
या वेळी शासनाची प्रतीकात्मक तिरडीवरून अंत्ययात्रा काढण्यात आली. स्मशानभूमीत प्रतीकात्मक अंत्ययात्रेचे दहन करण्यात आले. टाळ-मृदंगाच्या गजरात ही अंत्ययात्रा निघाली. मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी आपल्या भाषणात सरकारच्या शेतकरी धोरणाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. केंद्र व राज्य सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला.
या वेळी उद्योजक गोवंद खिलारी, बाळासाहेब बांगर, अश्विनी पोखरकर, राहुल भोर, दत्तात्रय भोर, अशोक भोर, स्वाती वाघमारे, बाळासोा पोखरकर, शैलेश वाबळे, अर्जुन बांगर, गुलाब पोखरकर, तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले.