सिग्नल होणार सिंक्रोनाईज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:30 AM2019-02-25T00:30:46+5:302019-02-25T00:30:49+5:30
शहरातील वाहतूककोंडीवर उपाय : स्मार्ट सिटीचा प्रकल्प
- विवेक भुसे
पुणे : शहरातील वाढती वाहनांची संख्या.. त्यात प्रमुख रस्त्यावरील सिग्नल एकमेकांशी जोडलेले नसल्याने प्रत्येक चौकाचौकांत सिग्नलवर थांबावा लागणारा वेळ यामुळे वाहतूककोंडीत भर पडत आहे़ यावर उपाय म्हणून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल सिंक्रोनाईज करण्याचा प्रकल्प स्मार्ट सिटीने आखला आहे़ यामुळे एका सिग्नलवरून वाहनचालक सुटला तर त्याला त्या रस्त्यावरील पुढील सिग्नल हिरवा मिळत जाईल व त्यातून वाहतूककोंंडी काही प्रमाणात कमी करण्यात यश येणार आहे़
मुंबईत एका सिग्नलवरून सुटल्यावर वाहनांना सलग ४ ते ५ किलोमीटर रस्त्यावरील सिग्नल हिरवा मिळतो़ त्यामुळे वाहनचालकांमध्ये थांबण्याची वेळ येत नाही़ परिणामी वाहतूककोंडी कमी होते़ मात्र, पुण्यात रस्त्यावरील दोन सिग्नल सिंक्रोनाईज नसल्याने वाहनचालकांना अनेकदा प्रत्येक सिग्नलला थांबावे लागते़ त्यातून वाहतूककोंडी वाढीस लागते़ त्याचबरोबर सिग्नल तोडण्याचे प्रमाणही वाढते़
शहरातील विविध रस्त्यांवर बसविण्यात आलेले सिग्नल हे वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या पद्धतीचे बसविण्यात आले आहेत़ त्यामुळे महत्त्वाच्या रस्त्यावरील सिग्नल हे सिंक्रोनाईज करणे शक्य होत नाही़ त्यामुळे हे सिग्नल सिंक्रोनाईज करण्यासाठी एटीएमएस योजना स्मार्ट सिटीने आखली आहे़
याबाबत वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी सांगितले की, एटीएमएस योजनेत सुरुवातीला पाच रस्त्यांची निवड करण्यात आली आहे़ हे पाच रस्ते स्मार्ट सिटी व्यवस्थापन पाच कंपन्यांना देणार आहे़ त्यावरील सिग्नल व्यवस्था कशी असावी याविषयी निकष ठरविण्यात आले आहे़ ज्या कंपनीला सर्वाधिक गुण मिळतील, त्यांना इतर रस्त्यावरील सिग्नल सिंक्रोनाईज करण्याचे काम दिले जाणार आहे़ या प्रकल्पामुळे ज्या दिशेला अधिक वाहने त्यांना योग्य वेळ दिला जाईल़ ही योजना येत्या दीड वर्षात पूर्ण होईल़
सिग्नल तोडण्याचे प्रमाण कमी होणार : एकापाठोपाठ सिग्नल मिळाल्याने वेळेची बचत
४हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर एकाच दिशेने जाणाऱ्या वाहनांना एकापाठोपाठ सिग्नल मिळत गेल्याने वाहनचालकांच्या प्रवासाच्या वेळेत बचत होईल व त्याचबरोबर एक सिग्नल तोडला तरी पुढच्या सिग्नलला थांबावे लागणार असल्याचे वाहनचालकांच्या लक्षात आल्यावर सिग्नल तोडण्याचे प्रमाण कमी होणार आहे़
आज सिग्नलचे टाइम योग्य नसल्याने अनेकदा वाहनचालकांना प्रत्येक सिग्नलला थांबावे लागते़ या प्रकल्पामुळे वाहनचालकांना योग्य वेळेत सिग्नल मिळेल़ रियल टाइम सिग्नलमुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे़
- तेजस्वी सातपुते,
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा़
चतु:शृंगी मंदिर ते प्रभात रोड जंक्शन : शिवाजी हौसिंग चौक, वेताळबाबा चौक, पत्रकारनगर जंक्शन चौक, भांडारकर रोड जंक्शन चौक, प्रभात रोड जंक्शन चौक़
अलका चौक ते नाथ पै चौक (शास्त्री रोड) : अलका चौक (टिळक चौक), विसावा मारुती चौक, शामराव गांजवे चौक, सेनादत्त पोलीस चौकी चौक, नाथ पै चौक़
गुंजन चौक ते विमाननगर : गुंजन चौक, शास्त्रीनगर चौक, कल्याणीनगर चौक, वडगावशेरी चौक, विमाननगर चौक़
आंबेडकर चौक ते बोल्हाई चौक : दोराबजी चौक, नेहरू मेमोरियल चौक, बॅनर्जी चौक, बोल्हाई चौक़
संचेती चौक ते अलका टॉकिज चौक : संचेती चौक, झाशी राणी चौक, नटराज चौक, खंडोजीबाबा चौक, अलका टॉकिज चौक (टिळक चौक)़