पुण्यात संशयित आढळल्याने यंत्रणा अलर्ट; तब्बल १९०० बालकांना गाेवरचा डाेस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 03:02 PM2022-12-08T15:02:33+5:302022-12-08T15:02:43+5:30
संभाव्य धाेका विचारात घेऊन शहरात बालकांचे लसीकरण सुरू
पुणे : शहरात गाेवरचे ७७ संशयित बालके आढळून आल्याने प्रशासन ॲक्शन माेडवर आले आहे. संभाव्य धाेका विचारात घेऊन शहरात बालकांचे लसीकरण सुरू केले आहे. आठवडाभरात ८५० बालकांना पहिला, तर १०५० जणांना दुसरा डोस दिला आहे. राज्यात ७ डिसेंबरपर्यंत १७ हजार ३१० बालकांना गोवर रुबेलाचा पहिला डोस, तर ९ हजार ८६५ बालकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.
गोवरवर नियंत्रण मिळवण्यासाठी विशेष लसीकरण सत्रे घेण्यात येत आहेत. त्यासाठी संवेदनशील भागांवर लक्ष दिले आहे. नियमित मोहिमेमध्ये ९ ते १२ महिन्यांदरम्यान गोवर रुबेला लसीचा पहिला डोस, तर १६ ते २४ महिने या
कालावधीत बालकांना दुसरा डोस दिला जातो. सध्या ९ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील जिल्हा आणि मनपा निहाययादी केली आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये राज्यात २ हजार ९५२ विशेष लसीकरण सत्रांमार्फत १ लाख ४६ हजार ११५ बालकांचे लसीकरण केले आहे.
गोवर आणि रुबेला लसीकरणाच्या विशेष मोहिमा राबविल्या जात असताना, पुरेसे डोस उपलब्ध होतील, याबाबतची काळजी आराेग्य विभागाकडून घेण्यात येत आहे. सध्या जिल्हा स्तरावर ११ लाख ५५ हजार ५७०, तर विभागीय स्तरावर १ लाख १९ हजार २५० डोस, राज्य स्तरावर ७९ हजार डोस असे एकूण १३ लाख ५३ हजार ८२० डोस उपलब्ध आहेत, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार समाेर आले आहे.
जिल्ह्यात ६८७ संशयित
पुणे जिल्ह्यात यावर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत गोवरचे ६८७ संशयित रुग्ण आढळून आले. त्यापैकी २२ जण पॉझिटिव्ह आढळून आले. याच काळा जिल्ह्यात १ लाख ७ हजार ८८० जणांना गोवर, रुबेला लसीचा पहिला डोस, तर ९१ हजार ६१८ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. पहिल्या डोसचे १०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले असून, दुसऱ्या डोसचे ५३ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
संशयित रुग्णांच्या परिसरात जागच्या जागी लसीकरण
शहरात २८ नोव्हेंबरपासून महापालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये दररोज, तर बाह्य रुग्ण विभागात आठवड्यातून दोनदा गोवर रुबेला लसीकरणाची सोय केली आहे. संशयित रुग्णांच्या परिसरात जागच्या जागी लसीकरण करण्यात येत आहे. - डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका