T-20 Cricket| बारामतीकरांना घेता येणार ‘महिला टी-२०’ सामन्यांचा आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 06:25 PM2022-09-03T18:25:57+5:302022-09-03T18:30:07+5:30
सर्व सामने हे शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह बारामतीकरांसाठी विनामूल्य आहेत...
बारामती :बारामती शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने १९ वर्षांखालील महिलांच्या टी-२० लीग सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या तीन दिवसांच्या सामन्यामधून काही खेळाडूंची निवड ही महाराष्ट्र राज्याच्या टी-ट्वेंटी संघात केली जाणार आहे.
४, ५ आणि ७ सप्टेंबर रोजी हे सामने बारामतीत होणार आहेत. यामध्ये सकाळी नऊ वाजता पहिला सामना तर दुपारी एक वाजता दुसरा सामना होणार आहे. यामध्ये ग्रुप ए, बी, सी, डी असे चार ग्रुप आहेत, यापैकी ग्रुप बी मधील सामने बारामतीत खेळविले जाणार आहेत.
चार सप्टेंबर रोजी कोल्हापूर विरुद्ध रत्नागिरी हा सकाळचा, तर दुपारच्या सत्रात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ए विरुद्ध पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांचा सामना होईल. ५ सप्टेंबर रोजी कोल्हापूर विरुद्ध पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ए विरुद्ध रत्नागिरी आणि सात सप्टेंबर रोजी पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशन विरुद्ध रत्नागिरी आणि कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ए असा सामना करणार आहे.
याबाबत क्रिकेट प्रशिक्षक धीरज जाधव यांनी माहिती दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रयत्नातून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आता प्रथम दर्जाचे क्रिकेटचे सामने खेळविण्याची मान्यता मिळाली असल्याने काही रणजी सामने देखील बारामतीत झाले आहेत. आता महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन महिलांचे १९ वर्षांखालील टी-२० लीग सामने बारामतीत घेण्याचा निर्णय घेतल्याने बारामतीकरांना टी-२० सामन्यांचा आनंद घेता येणार आहे.
सर्व सामने हे शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह बारामतीकरांसाठी विनामूल्य आहेत. बारामतीकरांनी या सामन्यास उपस्थित राहून महिला खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन धीरज जाधव यांनी केले आहे. शारदानगर शैक्षणिक संकुलाच्या वतीने राजेंद्र पवार व सुनंदा पवार यांनी या सर्व मुलींची निवास व भोजनाची व्यवस्था विनामूल्य केली आहे.