नाटकवेड्या तरुणांचे ‘टी४थिएटर’...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 08:28 PM2018-07-26T20:28:13+5:302018-07-26T20:43:21+5:30

चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राणच जणू! कामाचा कंटाळा, धावपळीने आलेला शीण असो की, प्रिय व्यक्तीशी झालेले भांडण, चहा या सगळया समस्या चुटकीसरशी सोडवतो. याच सुत्रात नाटकवेड्या तरुणांनी ‘टी४थिएटर’ हा अभिनव उपक्रम उभारला आहे.

'T4 theater' of dramatized youth ...! | नाटकवेड्या तरुणांचे ‘टी४थिएटर’...!

नाटकवेड्या तरुणांचे ‘टी४थिएटर’...!

Next
ठळक मुद्देडिसेंबर महिन्यापासून ‘टी४थिएटर’ या संकल्पनेची सुरुवात घराच्या गॅलरीमध्ये १० बाय १० च्या जागेत छोटासा सेटप्रायोगिक रंगभूमीवर होणारे विविध प्रयोग, कलाकृती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न

प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : मनोरंजनाच्या, करमणुकीच्या विविध पर्यायांचा भडिमार...वेगवान जीवनशैलीत आकर्षित करणारी मल्टिप्लेक्स संस्कृती...कलेबाबत रसिकांची बदलती अभिरुची...प्रेक्षकांची बदललेली जाण, या कोलाहलात प्रायोगिक रंगभूमी दुर्लक्षित राहते की काय, हा प्रश्न कलाप्रेमींना सतावत असताना नाटकवेड्या तरुणांनी यावर रामबाण उपाय शोधून काढला आहे. चहा कामातील तल्लफ वाढवतो, त्याप्रमाणे थिएटर जगण्यातील मजा! हाच धागा पकडून पुण्यातील तरुणांनी ‘टी४थिएटर’ ही आगळीवेगळी संकल्पना सोशल मीडियावर साकारली आहे.
चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राणच जणू! कामाचा कंटाळा, धावपळीने आलेला शीण असो की, प्रिय व्यक्तीशी झालेले भांडण, चहा या सगळया समस्या चुटकीसरशी सोडवतो. चहाची तल्लफ नात्यातील गोडवा वाढवते आणि सृजनाची निर्मितीही करते. चहा आयुष्यातील मजा वाढवण्यासाठी जेवढा आवश्यक तेवढील कलाही जीवन समृध्द करण्यासाठी अत्यावश्यक असते. याच सुत्रात नाटकवेड्या तरुणांनी ‘टी४थिएटर’ हा अभिनव उपक्रम उभारला आहे. नाटकांना प्रेक्षक नाही, अशी केवळ ओरड करण्यापेक्षा प्रायोगिक रंगभूमीवरील विविध प्रयोग, कलाकृती रसिकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या उपक्रमांतर्गत महिन्यातून साधारणपणे दोन-तीन वेळा रंगकर्मींशी संवाद साधला जातो. चहाबरोबर रंगणा-या या गप्पांमधून रसिकांना नव्या कलाकृतींची चवही चाखता येते.
       याबाबत ‘लोकमत’शी बोलताना विक्रांत महल्ले म्हणाला, ‘रंगभूमीच्या प्रत्येक टप्प्यावर नाट्यविषयक कल्पनांमध्ये बदल झालेला दिसतो. नाटक पाहणारा प्रेक्षक कमी झाला आहे, अशी आजकाल ओरड होते. व्यावसायिक नाटकांना आजही प्रेक्षकांची पसंती मिळते. समांतर रंगभूमीवर सामाजिक विषयांवर भाष्य केले जाते. या रंगभूमीचाही विशिष्ट असा प्रेक्षक आहे. प्रायोगिक रंगभूमीवरही सातत्याने नावीन्यपूर्ण प्रयोग होत असतात. विविध विषय हाताळून प्रयोगशीलता कायम ठेवली जाते. मात्र, प्रायोगिक नाटके प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागतो. हीच वस्तूस्थिती लक्षात घेऊन ‘टी४थिएटर’ हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.’
या उपक्रमांतर्गत प्रायोगिक रंगभूमीवर होणारे विविध प्रयोग, कलाकृती सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला जात आहे. प्रायोगिक रंगभूमीवरील कलाकार, दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधून १० ते १२ मिनिटांच्या कालावधीत रसिकांपर्यंत कलाकृतींचे बारकावे, विविध प्रयोग पोहोचवले जातात. फेसबूक, यूट्यूब, इन्स्टाग्रामच्या माध्यमातून हे व्हिडिओ शेअर केले जातात. महिन्यातून दोन-तीन कलाकारांना, दिग्दर्शकांना भेटून चर्चा केली जाते. यातून तरुण पिढीची रंगभूमीबाबतची जाण आणि अभिरुची वाढेल, नाटकांना नवा प्रेक्षक मिळेल, अशी या तरुणांना आशा आहे. यामध्ये विक्रांत महल्लेसह रितेश परब, सुमंत ठाकरे, तृप्ती देवरे, सागर खांडे, केतकी अरबट, मृणाल टोपले, विशेष गांधी, आकाश सुहाने आदी नाटकवेड्या तरुणांनी सहभाग घेतला आहे.
...................
‘टी४थिएटर’ या संकल्पनेची सुरुवात डिसेंबर महिन्यापासून करण्यात आली. नाटकांशी प्रेक्षक जोडला जावा, या हेतूने काम करत असताना घराच्या गॅलरीमध्ये १० बाय १० च्या जागेत छोटासा सेट उभारण्यात आला आहे. भविष्यात ज्येष्ठ रंगकर्मींंचे मार्गदर्शन घेऊन या संकल्पनेत आणखी भर घातली जाणार आहे.

Web Title: 'T4 theater' of dramatized youth ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.