Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत

By विश्वास मोरे | Published: June 30, 2024 05:33 PM2024-06-30T17:33:29+5:302024-06-30T17:33:41+5:30

लाखो वैष्णवांसहित पालखी दोन्ही पालखी सायंकाळी पुण्यात मुक्कामी येणार

Taal in Pune - Mridanga alarm started; Gyanoba-Tukoba will reach Gyangari from Udyog Nagar | Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत

Ashadhi Wari: पुण्यात टाळ - मृदंगाचा गजर सुरु; उद्योगनगरीतून ज्ञानोबा- तुकोबा पोहोचणार ज्ञानगरीत

पिंपरी : ऊन- सावल्याचा खेळ, अधून- मधून बरसणाऱ्या हलक्या पावसाच्या सरी अंगावर घेत संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ कैवल्य ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी पालखी सोहळा रविवारी सायंकाळी ज्ञानगरीत पोहोचणार.  

जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा शनिवारी रात्री आकुर्डीत मुक्कामास होता. आकुर्डीकरांचे आदरातिथ्य स्वीकारून विठ्ठल मंदिरातून रविवारी पहाटे पाचला सोहळा पुण्याकडे मार्गस्थ झाला. पहाटे ट्रस्टचे विश्वस्त गोपाळ कुठे यांच्या हस्ते महापूजा झाली. समाजआरती होऊन पालखी मार्गस्थ झाली. पालखी खंडोबा माळ चौकातून पुणे मुंबई महामार्गाने पिंपरीतील खराळवाडी येथील मंदिरात  सकाळी ६:४५ वाजता सोहळा पोहोचला. तिथे पहिला विसावा झाला. त्यानंतर सकाळी ८:३० च्या सुमारास सोहळा पुढे मार्गस्थ झाला. मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे स्वागत करण्यात येत होते. तर ठिकठिकाणी राजकीय नेत्यांचे स्वागत फलक झळकल्याचे दिसून आले. त्यानंतर पालखी दर्शनासाठी नेहरूनगर, वल्लभनगर, परिसरातील भक्तांनी गर्दी केली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सोहळ्याचा वेग कमी झाला. पिंपरी ते नाशिक फाटा उड्डाणपुलाच्या दुतर्फा गर्दी केली होती. पालखी सोहळा नाशिकफाटामार्गे दापोडीत दुपारच्या मुक्कामास थांबला. अनेक राजकीय पक्षांच्या व सामाजीक संस्थेच्या वतीने चहा नाष्टा पाणी फळांचे वाटप करुन वारकऱ्यांची सेवा केली. दुपारच्या विसाव्यानंतर पालखी खडकीमार्गे पुण्यात प्रवेशीला गेली.  

माऊलींचेही स्वागत 

आळंदीतून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भल्या सकाळीच वारीची वाट चालू लागला. इंद्रायणी ओलांडून देहूफाट्यावरून रविवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास शहरात आगमन झाले. वडमुखवाडी येथील थोरल्या पादुका मंदिरात विसावा झाला. त्यानंतर दिघीच्या मॅक्झिन चौकात स्वागत केले. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी फुगडी खेळली. पखवाज वाजविला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आदी उपस्थित होते. वारकऱ्यांचे स्वागत केले. त्यानंतर सोहळा विश्रांतवाडी मार्गे पुण्याकडे मार्गस्थ झाला. मार्गावर वारकऱ्यांना अन्नदान, चहा नास्ता वाटप करण्यात आले. दर्शनासाठी गर्दी लोटली होती. मार्गावर राजकीय नेत्यांचे फ्लेक्स लक्षवेधी होते.

Web Title: Taal in Pune - Mridanga alarm started; Gyanoba-Tukoba will reach Gyangari from Udyog Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.