विद्यापीठाशी नात्याचे रणगाडा प्रतिक, लेफ्टनंट जनरल पी. हॅरिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:45 AM2017-11-30T03:45:22+5:302017-11-30T03:46:01+5:30
लष्कराच्या दक्षिण विभागाचे (सदर्न कमांड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी दीर्घ काळापासून नाते आहे. आमचे अधिकारी आणि जवानांची बौद्धिक बाजू समृद्ध करण्यास विद्यापीठाची खूप मोठी मदत झाली.
पुणे : लष्कराच्या दक्षिण विभागाचे (सदर्न कमांड) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी दीर्घ काळापासून नाते आहे. आमचे अधिकारी आणि जवानांची बौद्धिक बाजू समृद्ध करण्यास विद्यापीठाची खूप मोठी मदत झाली. त्यामुळे विद्यापीठाला भेट दिलेला रणगाडा म्हणजे विद्यापीठाशी आमच्या असलेल्या नात्याचे दीर्घ एक प्रतिकच आहे, असे गौरवोद्गार लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल पी. एम. हॅरिस यांनी सोमवारी काढले.
विद्यापीठाच्या संरक्षण व सामरिकशास्त्र (डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज) विभागाला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाकडून टी-५५ प्रकारचा रणगाडा भेट दिला. संरक्षण विभागाच्या आवारात हा रणगाडा ठेवण्यात आला आहे. त्याचे अनावरण बुधवारी हॅरिस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम, विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामुळे आम्हाला आमच्या लोकांना बौद्धिक बाबी पुरवता येतात.
वैदिक पध्दतीने पुजा करून अनावरण
ग्विद्यापीठाला भेट देण्यात आलेल्या रणगाडयाची वैदिक पध्दतीने पूजा करून त्याचे अनावरण करण्यात आले. विद्यापीठ हे धर्मनिरपेक्ष, लोकतांत्रिक व संविधानिक संस्था असून वैदिक पध्दतीने विद्यापीठात पुजा केल्यामुळे संविधानातील धर्मनिरपेक्ष तत्त्वाचे उल्लंघन झाले नाही याबाबत विद्यापीठाने खुलासा करावा अशी मागणी फुले-शाहू-आंबेडकर विद्यार्थी कृती समितीच्यावतीने करण्यात आली आहे. दरम्यान लष्कराच्या प्रथेप्रमाणे त्यांच्या पुजाºयांकडून ही पुजा करण्यात आल्याचा खुलासा विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आला आहे.