इंदापूर तालुक्यातील तीन गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई ; गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 06:44 PM2021-02-26T18:44:07+5:302021-02-26T18:44:38+5:30
इंदापूर तालुक्यातील तीन जणांवर तडीपार कारवाईने तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
बाभूळगाव : निरा-नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील अवैध वाळु तस्करी करणार्या तीन जणांवर इंदापूर व अकलूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कलमान्वये ६ गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याने पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी गुन्हेगारांना इंदापूर तालुक्यातील दोन महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश दिल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
या प्रकरणी अक्षय संजय गोडसे, योगेश संजय गोडसे व संजय रामदास गोडसे (सर्व रा.नीरा नरसिंहपूर,ता.इंदापूर,जि.पुणे) अशी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१२ ते २०२० या कालावधीमध्ये आरोपींवर जिल्ह्यातील तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे आरोपीवर कारवाई करण्यासंदर्भात पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची चौकशी होऊन अधिक्षकांनी आरोपींना इंदापूर तालुक्यातून दोन महिने तडीपार (हद्दपार) करण्याचे आदेश रोजी दिले. इंदापूर प्रभारी पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी वरील तीन आरोपींवर दोन महिन्यासाठी इंदापूर तालुक्यातुन हद्दपार करण्याची कारवाई केली आहे.
————————————————————————
कारवाईच्या भीतीने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
इंदापूर तालुक्यातील तीन जणांवर तडीपार कारवाईने तालुक्यातील गुन्हेगारी क्षेत्रातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. कारवाई होण्याच्या भीतीपोटी अनेक सराईत गुन्हेगार भूमिगत झाल्याची चर्चा आहे. आणखी काही सराईत गुन्हेगारांवर कारवाई होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.