काळूस येथील तडीपार गुंडास ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:16 AM2021-09-04T04:16:26+5:302021-09-04T04:16:26+5:30
चाकण : रेकॉर्डवरील तडीपार गुंडास खेड तालुक्यातील काळूस येथून ताब्यात घेण्यात आले असून शुक्रवारी (दि.३) रात्री त्यास बेड्या ...
चाकण : रेकॉर्डवरील तडीपार गुंडास खेड तालुक्यातील काळूस येथून ताब्यात घेण्यात आले असून शुक्रवारी (दि.३) रात्री त्यास बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त श्रीकृष्ण प्रकाश यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच तडीपार गुंडांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार चाकण पोलिसांनी ही कारवाई केली.
अमोल ऊर्फ नकुल ज्ञानेश्वर कदम (वय २४, रा. काळूस, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांनी रात्रीच्या गस्ती दरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार व तडीपार गुंडांची तपासणी करण्याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक पूनम जाधव, पोलीस हवालदार मच्छिंद्र भांबुरे, ईश्वर भोसले आदींनी चाकण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सरकारी वाहनाने रात्रगस्त घातली. त्यावेळी दीड वाजण्याच्या सुमारास पूनम जाधव यांना अधिकृत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील तडीपार इसम नकुल ऊर्फ अमोल ज्ञानेश्वर कदम यास पुणे जिल्हा व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आले होते. कदम याला तडीपार केले असताना कोणतीही पूर्वपरवानगी न घेता तो काळूस येथे घरी आलेला आहे. सदर बातमीची खात्री करण्यासाठी पूनम जाधव व त्यांचे अन्य सहकारी कदम याच्या घरी गेले असता तो घरीच मिळून आला.
कदम यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्यावर चाकण पोलीस स्टेशनला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूनम जाधव, पोलीस हवालदार संदीप सोनवणे व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.