तडीपार गुंडाचा पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:10 AM2021-04-20T04:10:19+5:302021-04-20T04:10:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर तडीपार गुंडाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकावर तडीपार गुंडाने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने सावध असलेल्या पोलिसांनी हा हल्ला चुकविला. पोलीस उपनिरीक्षकांसमवेत असलेल्या पोलिसांना वीट मारली.
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी कुमार भागवत चव्हाण याला अटक केली आहे. तर सराईत गुन्हेगार प्रतीक पृथ्वीराज कांबळे (दोघेही रा. मंगळवार पेठ) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नरेश केशव वाडेवाले यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवार पेठेतील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ रविवारी सायंकाळी ५ वाजता घडली. प्रतीक कांबळे याला तडीपार करण्यात आले आहे.
मंगळवार पेठेत लावलेले शासकीय कॅमेरे आरोपींनी हलविले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांना ताब्यात घेण्यासाठी वाडेवाले व त्यांचे सहकारी मंगळवार पेठेत गेले होते. तेथे आरोपी रिक्षात बसले होते. त्यावेळी प्रतीक कांबळे याने वाडेवाले यांना मला पकडतो का, मी आता तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणून हातातील कोयत्याने त्यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा वाडेवाले मागे सरकले. आरोपी कुमार चव्हाण याने वीट उचलून वाडेवाले यांच्याबरोबर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना मारली. त्यांनी कुमार चव्हाण याला पकडले. तोपर्यंत प्रतीक कांबळे हा पळून गेला.
फरासखाना पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न करणे व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे़.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले यांनी सांगितले की, तेथील कॅमेरे हलविल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार आम्ही मंगळवार पेठेतील बुद्ध विहाराजवळ आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेलो होतो. तेवढ्यात तडीपार गुंड प्रतीक कांबळे हा हातात कोयता घेऊन धावत आला. आम्ही सावध असल्याने त्याचा वार चुकविला. तेव्हा तो कोयत्याचा धाक दाखवत पळून गेला. आम्ही कुमार चव्हाण याला ताब्यात घेतले. चव्हाण याला न्यायालयात हजर केले. सरकारी वकील किरण बेंडभर यांनी तडीपार गुंड कांबळे याला पकडायचे आहे. यांनी कोयता का बाळगला होता, याचा तपास करायचा आहे, असे सांगितले. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली.