तडीपार गुडांची कारागृहात रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:27 AM2021-02-20T04:27:37+5:302021-02-20T04:27:37+5:30
पुणे : तडीपार असताना शहरात फिरणाऱ्या गुंडाला पकडून बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने त्यांची ...
पुणे : तडीपार असताना शहरात फिरणाऱ्या गुंडाला पकडून बिबवेवाडी पोलिसांनी २४ तासांत दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने त्यांची कारागृहात रवानगी केली.
अण्णा घारे ऊर्फ सचिन पांडुरंग सोंडकर (वय ३७, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध बिबवेवाडी, सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, अपहरण, जबरी चोरी तसेच धमकावणे व लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला पोलीस उपायुक्तांनी २४ एप्रिल २०१९ रोजी २ वर्षांसाठी पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार केले होते. असे असताना तो बिबवेवाडी परिसरात फिरत होता. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर व यश बोराटे, अतुल थोरात व त्यांचे सहकारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजता पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलिसांना पाहून सोंडकर हा पळून जात होता. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याच्याविरुद्ध तडीपारीच्या भंगाचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने दोषारोप पत्र तयार केले. दोषारोपासह आरोपीला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सोंडकर यांची कारागृहात रवानगी केली आहे.