९१ वर्षांच्या आजीचा न्यायासाठी टाहो
By admin | Published: April 20, 2017 06:36 AM2017-04-20T06:36:45+5:302017-04-20T06:36:45+5:30
मागील सहा वर्षांपासून गावातील हक्काच्या घराचा गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने ताबा घेतला आहे. उतारवयात त्यांच्यावर घरासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली
बारामती : मागील सहा वर्षांपासून गावातील हक्काच्या घराचा गुंडप्रवृत्तीच्या व्यक्तीने ताबा घेतला आहे. उतारवयात त्यांच्यावर घरासाठी दारोदारी फिरण्याची वेळ आली. पंचायत समिती, ग्रामपंचायतीने वारंवार पोलीस प्रशासनाला घराचा ताबा देण्याची विनंती केली. परंतु खाकी वर्दीतील माणुसकी काही जागी होत नाही. त्यामुळे ९१ वर्षांच्या आजीने न्यायासाठी टाहो फोडला आहे.
पणदरे (ता. बारामती) येथील शकुंतला फिलोमन दामले या ९१ वर्षांच्या आजी त्यांच्या दोन मुले अशोक, प्रवीण यांच्यासह बारामती पंचायत समितीच्या आवारात न्याय मागण्यासाठी बसून आहेत. जोपर्यंत घराचा ताबा प्रशासन देत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. शकुंतला दामले या अल्पसंख्याक ख्रिश्चन प्रवर्गातील आहेत. घरची परिस्थिती हलाखीची आहे. ग्रामपंचायतीकडून घरकुल मिळाले होते. मात्र उपजीविकेसाठी काही दिवस त्यांना बाहेरगावी जावे लागले. यादरम्यान दामले यांच्या घराचा ताबा घेतलेल्या हनुमंत हरिभाऊ चौरे याने तत्कालीन ग्रामसेवकास हाताशी धरून घरनोंदी असलेल्या ग्रामपंचायतीमधील नोंदवहीमध्ये दामले यांच्या नावाची खाडाखोड करून स्वत:चे नाव लावले. अशोक फिलोमन दामले यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी ग्रामपंचायत, बारामती पंचायत समितीकडे धाव घेतली. २५ मे २०१५ ला तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी दामले यांच्या बाजूने तपासणी अहवाल दिला. तसेच हनुमंत चौरे यास तत्काळ घर खाली करण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही चौरे याने घर खाली न करता अशोक फिलोमन दामले यांना धमकावले. तसेच मी कोणाला घाबरत नाही, कोठे जायचे तिथे जा, असे सांगितले. यानंतर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याला पणदरे ग्रामपंचायत व बारामती पंचायत समितीने दामले यांना घराचा ताबा मिळवून द्यावा, यासाठी विनंती अर्ज केले. सलग दीड ते दोन वर्षांपासून हे विनंती अर्ज वडगाव पोलीस ठाण्याला मिळत आहेत. परंतु वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचा एकही पोलीस कर्मचारी अथवा अधिकारी दामले यांच्याकडे फिरकलादेखील नाही.