‘लक्ष्मी’दर्शनासाठी कासव होताहेत जेरबंद

By Admin | Published: March 17, 2016 03:19 AM2016-03-17T03:19:09+5:302016-03-17T03:19:09+5:30

कासव घरात असले की लक्ष्मीचे दर्शन होते, या लालसेपोटी अनेक जण कासवाला घरात बंद करून ठेवत आहेत. कासवाची किंमत पन्नास हजारांपासून लाखाच्या घरात आहे.

Tailored for 'Lakshmi' | ‘लक्ष्मी’दर्शनासाठी कासव होताहेत जेरबंद

‘लक्ष्मी’दर्शनासाठी कासव होताहेत जेरबंद

googlenewsNext

रहाटणी : कासव घरात असले की लक्ष्मीचे दर्शन होते, या लालसेपोटी अनेक जण कासवाला घरात बंद करून ठेवत आहेत. कासवाची किंमत पन्नास हजारांपासून लाखाच्या घरात आहे. ही कासवे नेमकी कुठून येतात, या मागाचा मास्टर माइंड कोण, याबाबत पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी मात्र अनभिज्ञच आहेत. हजारो कासव बंदिवासात अडकली आहेत.
कमी वेळात अधिक समृद्धी देण्याचे काम कासव करीत असल्याची अंधश्रद्धा आहे. प्रत्येकाच्या जीवनात सुखसमृद्धी, संपत्ती कमी वेळात मिळावी, म्हणून पगारदारांच्याही घरात कासव पाळले जात आहे. कासव हा सुखसमृद्धी मिळण्याचे प्रतीक मानले जाते. कासवाला दीर्घायुष्य असते. या मुक्या प्राण्याला मागील अनेक वर्षांपासून बंदिस्त करण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. घरातील वास्तुदोष आणि शत्रूपासून स्वत:चे रक्षण करणे, रोग व अनेक व्याधींपासून दूर राहण्यासाठी कासवाची मोठ्या किमतीत खरेदी करून त्याला बंदिस्त करण्याचे प्रकार आजघडीला शहरात वाढीला लागल्याचे दिसून येत आहेत.

नेत्यांच्या घरात दिसतेय कासव
कासव हा वन्यजीव प्राणी असला, तरी अनेक राजकीय नेत्यांच्या घरी फिशपॉटमध्ये कासव शोभेची वस्तू म्हणून दिसत आहे. घरात सुखसमृद्धी लाभावी, आपण आगामी निवडणुकीत सर्वाधिक मताने विजयी होण्यासाठी अनेक नेत्यांनी या कासवाला बंदिस्त करून ठेवले आहे. या नेत्यांच्या घरात शोभेची वस्तू म्हणून हा जिवंत कासव पाहायला मिळत आहे.

कासवाची शोधाशोध
एका महिन्यात आपण श्रीमंत व्हावे, घरात सुखसमृद्धी नांदावी, आपल्या घराला कोणाचीही दृष्ट लागू नये, यासाठी आजच्या या आधुनिक युगात अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. पुणे जिल्ह्यातच नव्हे, तर महाराष्ट्रातील मोठ्या नदीमध्ये कासवाचे पिल्लू पकडण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. ग्रामीण भागातून पुणे, मुंबईसारख्या शहरात पाच लाखांच्या वर मागणी असल्याने अनेक जण कासव पकडण्यासाठी विहिरी व नदीत दिवसभर अधिक मेहनत करीत आहेत.

वन विभागाचे दुर्लक्ष
एखाद्या मुक्या प्राण्याला बंदिस्त करून एका ठिकाणी ठेवणे हा वन विभागाच्या कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. पण, याबाबत कोणीच तक्रार नाहीत. त्यामुळे तेरी-भी चूप मेरी भी चूप अशा प्रकारांमुळे कोणाचे लक्ष नसल्याचे चित्र दिसत आहे.

प्राण्याच्या संबंधित अनेक अंधश्रद्धा प्रचलित आहेत. या सगळ्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही. कासवामुळे श्रीमंती होते, ही एक अंधश्रद्धा आहे. कासवाच्या माध्यमातून कोणी चमत्कार करण्याचा दावा करत असेल, तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधावा. चमत्कार करणाऱ्यांवर जादूटोणा विधायकांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा बाबी टाळण्यासाठी कठोर कायदाही हवा आहे. तसेच, प्रबोधन करण्याचीही आवश्यकता आहे. - हमीद दाभोलकर, सरचिटणीस

Web Title: Tailored for 'Lakshmi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.