ताजमहालाचे दस्ताऐवज पुण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 03:48 AM2018-05-26T03:48:28+5:302018-05-26T03:48:28+5:30
मुघलांची राजवट संपुष्टात आल्यानंतर ताजमहालाचा मालकी हक्क ब्रिटिशांकडे आला होता.
पुणे : जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आग्रा येथील ताजमहालाचा आता पुण्याशी नवा ऋणानुबंध जोडला जाणार आहे. ताजमहालाच्या मालकी हक्काविषयी हस्तांतरणासंदर्भातील ऐतिहासिक दस्ताऐवज पुण्यात उपलब्ध झाले आहेत. ऐतिहासिक वास्तुचे मालकी हक्क सैन्यदल की नागरी प्रशासनाकडे असावे या संदर्भातील पत्रव्यवहार झालेले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांच्या प्रयत्नातून ही प्रत मिळणार असून खडकीच्या संरक्षण दलातर्फे नव्याने उभारण्यात आलेल्या जतन आणि संशोधन केंद्रात (एयू अँड आरसी) ही प्रत संग्रहित करण्यात येणार आहे.
मुघलांची राजवट संपुष्टात आल्यानंतर ताजमहालाचा मालकी हक्क ब्रिटिशांकडे आला होता. स्वातंत्र्य मिळाल्यावर ताजमहालाचा मालकी हक्क भारत सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता.
दरम्यान ताजमहाल हा सैन्याच्या ताब्यात असावा, की नगरी प्रशासनाकडे यासंदर्भात कंपनीचे अधिकारी कर्नल क्लेअर यांनी स्थानिक प्रशासनाकडे पत्र लिहले होते. ब्रिटिशांकडून मालकी हक्क मिळाल्यानंतर ताजमहालाचे जतन करण्याची जबाबदारी भारत सरकारतर्फे पुरातत्त्व खात्याकडे सोपविण्यात आली होती.
ऐतिहासिक वारसा या विषयाबाबत माझ्या मनात प्रचंड आवड आणि कुतुहल आहे. ताजमहाल विषयीच्या कागदपत्रांची जबाबदारी माझ्याकडे होती. त्यामुळे ताजमहालाच्या हक्काबाबतच्या कागदपत्राची एक प्रत स्वत:जवळ असावी, असे मनोमन वाटत होते. त्यामुळे तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेतली. एक प्रत माझ्याकडे ठेवली. या कागदपत्राची मूळ प्रत दिल्ली येथील कार्यालयात आहे. पुण्यातील केंद्रातही या कागदपत्राचे जतन व्हावे, अशी इच्छा होती. त्यामुळेच हे कागदपत्र जतन केंद्राकडे सोपविले. या पत्रव्यवहारांमधून इंग्रज अधिकाºयांची इतिहासातील वारसास्थळांप्रतिची आत्मीयता दिसून येते. - डॉ. डी. एन. यादव