तिकिटाचे दर वाढवणाऱ्या विमान कंपन्यांवर कारवाई करा! लूटमार त्वरित थांबवा, ग्राहक पंचायतीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 20:36 IST2025-04-24T20:35:12+5:302025-04-24T20:36:56+5:30
सध्या श्रीनगर ते नागपूर विमान भाडे ५५ ते ६० हजारांपर्यंत पोहोचले असून श्रीनगर ते मुंबई ३० ते ३५ हजारांपर्यंत पोहोचले आहे

तिकिटाचे दर वाढवणाऱ्या विमान कंपन्यांवर कारवाई करा! लूटमार त्वरित थांबवा, ग्राहक पंचायतीची मागणी
पुणे : काश्मिर खोऱ्यात अतिरेक्यांच्या हल्ल्याचा फायदा घेत काही विमान कंपन्यांनी नेहमीपेक्षा चौपट भाडे आकारल्याचे दिसून येत आहे. विमान कंपन्यांनी त्यांचे भाडे अंतराप्रमाणे घ्यावे, प्रवाशांच्या मागणीमुळे वाढीव भाडे घेऊ नये, त्याचप्रमाणे एअरलाईन्सकडून तिकीटाचे रि-बुकींग अथवा रद्द करण्याचे शुल्कही माफ करावे. यासाठी ग्राहक पंचायतीच्या वतीने नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू तसेच या खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ व संबंधित अधिकार्यांना पत्र पाठवून विमान कंपन्यांनी प्रवाशांची चालवलेली लुटमार त्वरित थांबवावी, असे आवाहन ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी केली आहे.
सध्या श्रीनगर ते नागपूर विमान भाडे ५५ ते ६० हजारांपर्यंत पोहोचले आहे. तसेच श्रीनगर ते मुंबई ३० ते ३५ हजारांपर्यंत पोहोचले आहे. यापूर्वी हीच तिकीटे ९ ते १० हजारांपर्यंत मिळत होती. अशाच प्रकारे पुणे-अहमदाबाद-बंगलोर-कलकत्ता इत्यादी शहरांसाठी तिकीटाचे दर भरमसाठ वाढले आहेत. केंद्रीय नागरी वाहतूक मंत्र्यांनी यावर सर्व विमान कंपन्यांना कडक निर्देश द्यायला हवेत आणि त्याचे पालन न झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीच्या वतीने केली आहे.