कामात ‘झोल’ करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:09 AM2021-04-10T04:09:35+5:302021-04-10T04:09:35+5:30
पुणे : सध्या आर्थिक संकटात असताना महापालिकेच्या कोट्यवधींच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू असून, ‘मार्च एंड’मुळे विकासकामांचा झपाटा सुरू ...
पुणे : सध्या आर्थिक संकटात असताना महापालिकेच्या कोट्यवधींच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू असून, ‘मार्च एंड’मुळे विकासकामांचा झपाटा सुरू आहे. या कामांचा दर्जा निकृष्ट असून, त्याद्वारे भ्रष्टाचार पोसला जात आहे. या संदर्भातच पालिका आयुक्तांनी १९ अभियंत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणांची सनदी लेखापालांमार्फत चौकशी करून दोषी अभियंत्यांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबतचे निवेदन महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना देण्यात आले आहे.
मार्च एंडच्या कामांमध्ये क्षेत्रीय कार्यालय स्तरावर केलेली कामे निकृष्ट दर्जाची असून अनेक कामे अशास्त्रीय पद्धतीने करण्यात आली आहेत. दक्षता पथकाने २३ कामांची प्रत्यक्ष पाहणी करीत त्याचा सविस्तर अहवाल आयुक्तांना सादर केला. यामध्ये सर्वाधिक दोष ‘थर्ड पार्टी ऑडिट’ला देण्यात आलेला आहे. अहवालाच्या आधारे आयुक्तांनी एक परिमंडळ उपायुक्त, दोन सहायक आयुक्त, तीन कार्यकारी अभियंता यांच्यासह ११ कनिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
यासंदर्भात शहर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे. आयुक्तांच्या कार्यपद्धतीचे समर्थन करतानाच दर्जाहीन कामे करणारे, कामे न करताच बिले काढणारे तसेच चुकीचे मोजमाप करून कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्यांना पाठीशी घालू नये. मागील चार वर्षांत केलेल्या कामांची तपासणी करावी. थर्ड पार्टी एजन्सींचीही चौकशी करावी. सनदी लेखापालांमार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, श्याम देशपांडे, गजानन थरकुडे, विजय देशमुख, गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.
-------
ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करा
प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संजय बालगुडे यांनीही आयुक्तांना निवेदन दिले आहे. पालिकेच्या निविदेप्रमाणे काम न करताच मोठ्या प्रमाणावर बिले अदा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कामाची पाहणी न करताच थर्डपार्टी इन्स्पेक्शन करणाऱ्या संस्था तसेच अधिकारी फाईलवर सह्या करतात. ठेकेदारांसोबतच अधिकारीही दोषी आहेत. कामे न करताच बिले घेणाऱ्या ठेकेदारांचीही चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
------------------