जादा बिल आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:34+5:302021-05-22T04:11:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली तशी रुग्णालयांनी रुग्णांना जास्तीचे बिल लावून लूट ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली तशी रुग्णालयांनी रुग्णांना जास्तीचे बिल लावून लूट देखील केली आहे. यामुळेच सर्व कोविड रुग्णालयांतील रुग्णांकडून आकारणी करण्यात आलेल्या बिलांची तपासणी करुन वाढीव बिले आकारणाऱ्या तसेच रुग्णांसाठीच्या औषधांमध्ये गैरप्रकार करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
पुण्यातील कौन्सिल हॉल येथे पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या वेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार ॲड. अशोक पवार, संजय जगताप, संग्राम थोपटे, सुनील टिंगरे, अतुल बेनके, सुनील शेळके, चेतन तुपे, राहुल कुल, सिद्धार्थ शिरोळे, दिलीप मोहिते-पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम, भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील कोरोना विषाणूची सद्यस्थिती, म्युकरमायकोसीसची सद्यस्थिती, प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, लहान बालकांसाठी वैद्यकीय सुविधा तसेच लसीकरण आदी विषयांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.
पवार म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमधील धोका विचारात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक मजबूत होणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ, यंत्रसामग्री, लहान मुलांवरील उपचाराबाबत प्रतिबंधात्मक औषधे उपलब्ध करुन द्या. लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र खाटा राखीव ठेवण्याबाबत कार्यवाही करा.
अग्निशमन यंत्रणा- जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून घेऊन त्रुटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. फायर ऑडिट करुन न घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
---------