डेहणे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:12 AM2021-09-23T04:12:42+5:302021-09-23T04:12:42+5:30
राजगुरुनगर : डेहणे (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर येत असून रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. ...
राजगुरुनगर : डेहणे (ता. खेड) येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर येत असून रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. जनतेच्या जिवाशी चाललेला हा खेळ थांबावावा व दोषी वैद्यकीय अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा पुणे व अखिल भारतीय किसान सभा राजगुरुनगर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन गटविकास अधिकारी अजय जोशी यांच्याकडे दिले आहे.
डेहणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांबाबत अशा घटना डॉक्टरांकडून वारंवार होत आहेत. त्याचा मोबदला म्हणून अनेक पेशंटला आपला जीव गमवावा लागतो. वैद्यकीय आधिकाऱ्यांनी निष्काळजीपणाची कामे थांबवावीत. रुग्णांना विनाकारण होणाऱ्या त्रासाला आळा बसावा यासाठी अखिल भारतीय किसान सभा पुणे राजगुरुनगर यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार केला आहे. तालुका व जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले होते. व सदर डॉक्टर व इतर कर्मचारी यांच्यावर ती योग्य ती कारवाई करावी अशा प्रकारचे निवेदने दिली होती. परंतु यावर कोणतीही कार्यवाही न केल्याने रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, याबाबत कुठलीही सुधारणा होत नाही असे अखिल भारतीय किसान सभा राजगुरुनगरचे अमोद गरुड, महेंद्र थोरात, विकास भाईक यांनी सांगितले.
--
सर्पदंश झालेल्या महिलेच्या उपचारात हलगर्जीपणा
२० सप्टेंबर रोजी भिवेगाव येथील सखूबाई ज्ञानेश्वर वनघरे या महिलेला सर्पदंश झाल्याने प्राथमिक रुग्णालय डेहणे या ठिकाणी उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे त्यांना तेथून प्राथमिक रुग्णालय घोडेगाव या सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी जाण्यास सांगण्यात आले. रुग्णाची अवस्था नाजूक असतानाही पीडित कुटुंबास व रुग्णास रुग्णालयाने रुग्णवाहिका पुरवली नाही. असा आरोप अखिल भारतीय किसान सभा राजगुरुनगर यांनी केला आहे. पीडित कुटुंबाने रुग्णाला खासगी गाडीने घोडेगाव या पुढील उपचारासाठी तत्काळ हलवले. परंतु ग्रामीण रुग्णालय घोडेगावमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी सदर महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगितले.