मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 09:44 AM2023-11-30T09:44:26+5:302023-11-30T09:44:47+5:30
नामफलक हा इतर भाषेमध्येसुद्धा असला तरी नावापेक्षा मराठीतील नाव लहान ठेवता येणार नाही
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत मराठी भाषेत लावणे बंधनकारक केले आहे. जे व्यावसायिक मराठीमध्ये पाट्या लावणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश आकाश चिन्ह विभागाने परिपत्रक काढून दिले आहे.
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम २०१७ मध्ये मार्च २०२२ मध्ये सुधारणा केली. त्यामध्ये कलम ३६ क च्या तरतुदींनुसार दुकानांच्या पाट्या मराठी देवनागरी लिपीत, ठळक अक्षरात असणे बंधनकारक आहे. त्याचसोबत नामफलक हा इतर भाषेमध्येसुद्धा असू शकेल. पण, इतर भाषेतील नावापेक्षा मराठीतील नाव लहान ठेवता येणार नाही, असे यामध्ये नमूद करण्यात आले होते.
मराठी पाट्यांसदर्भात फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स असोसिएशन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यामध्ये दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी देवनागरी लिपीत ठळक अक्षरात लावण्याबाबत दोन महिन्यांची मुदत दिली होती. मात्र, शहरातील अनेक दुकाने, शोरूम, मॉल, हॉटेल, लॉज यांसह अन्य आस्थापनांचे नामफलक हे इंग्रजी अक्षरातून मोठ्या आकारात लिहिले आहेत. तसेच मराठी भाषेत नाव असले, तरी ते इंग्रजीपेक्षा कमी आकाराचे आहे. त्यामुळे यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे.
आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त जगताप यांनी मराठी भाषेत पाट्या न लावणारे, मराठी भाषेपेक्षा इतर भाषेतील नामफलक मोठा असेल तर अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयाच्या सहायक आयुक्तांसह परिमंडळाच्या उपायुक्तांना दिले आहेत.
महान व्यक्ती, गडकिल्ल्यांची नावे नको
ज्या ठिकाणी दारू विक्री होते किंवा दारू पुरविली जाते अशा कोणत्याही आस्थापनेचे नाव हे महान व्यक्तींच्या नावे किंवा गड किल्ल्यांच्या नावे असू नये, असेही महापालिकेने आदेशात नमूद केले आहे.