टँकर माफियांवर कारवाई करणार; पुणे पालिका आयुक्त कुणाल कुमार यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 11:56 AM2017-11-15T11:56:26+5:302017-11-15T12:39:20+5:30
येरवडा, वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रातून पाण्याची चोरी करून ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसायिकांना पाणी पुरवले जाते. याची दखल घेत पालिका आयुक्तांनी कुणाल कुमार यांंनी टँकर माफियांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
लोकमत इफेक्ट
कोरेगाव पार्क : येरवडा आणि वडगाव शेरी टँकर भरणा केंद्रातून पाण्याची चोरी करून ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसायिकांना पाणी पुरवले जाते. या टँकर माफियांचा पर्दाफाश करणारी बातमी दै. लोकमत मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल पालिका आयुक्तांनी कुणाल कुमार यांंनी घेत, पाणी चोरणार्या टँकर माफियांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
महापालिका टँकर भरणा केंद्रावर पाणी भरण्यासाठी टँकर मालकांना पालिकेकडून पास घ्यावे लागतात. एका पासावर दहा हजार लिटर पाणी मिळते. टँकर मालकांना ठराविक पास दिले जातात. टँकर भरणा केंद्रातील कर्मचार्याला पास दिल्यानंतर टँकरमध्ये पाणी सोडले जाते. पास नसेल तर टँकर मालकांना पाणी मिळत नाही, अशी टँकर भरणा केंद्रावरील कार्यपध्दती आहे. मात्र, टँकर माफिया अतिरिक्त पाणी मिळवण्यासाठी पालिकेच्या कर्मचार्यांना मॅनेज करून एकाच पास वर ४ ते ५ टँकर पाण्याची चोरी करतात. काही जण पास न देताच पाण्याची चोरी करतात. टँकर भरणा केंद्रावरील रजिस्टरमध्ये या टँकरची नोंद नसते. महापालिकेने टँकर भरणा केंद्रावरून पाणी घेणार्या खासगी टँकरला जीपीआरएस यंत्रणा बसविल्याशिवाय टँकर चालकांना पाणी भरण्याचे पास न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाची अमंलबजावणी प्रत्यक्षात टँकर भरणा केंद्रावर होत नसल्याचे समोर आहे. वडगावशेरी टँकर भरणा केंद्रावरून पाणी भरणार्या माफियानी जीपीआरएस यंत्रणा बंद करून, पालिकेच्या हद्दीबाहेरील गावा बाहेर पाणीपुरवठा करतात. वडगावशेरी आणि येरवडा या दोन टँकर भरणा केंद्रावरून दिवसाला पन्नास ते साठ लाख लिटर पाण्याची चोरी होते. केंद्रावरील मीटर बंद आहेत. येरवडा टँकर भरणा केंद्रावर सीसीटीव्ही नाहीत. पाणी सोडणारा इलेक्ट्रीकल व्हॉल बंद आहे.
टँकर भरणा केंद्रातील या घोटाळ्याबाबत पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी सांगितले, की टँकरचे जीपीआरएस बंद करणे, ग्रामीण भागातील बांधकाम व्यवसाय करणार्या पाणी पुरवणे, टँकर भरणा केंद्रावर पाणी चोरणार्यांवर कारवाई करणार आहे. कारवाईची सूचना संबधित अधिकार्यांना दिल्या आहेत.