देहूरोड सातारा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण कामाला मुदतवाढ देणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:20 AM2021-09-02T04:20:59+5:302021-09-02T04:20:59+5:30
पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० पासून सुरू आहे. हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत पूर्ण ...
पुणे : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० पासून सुरू आहे. हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असताना २०२१ उजाडले तरी पूर्ण झालेले नाही. नुकतेच पुन्हा एकदा या कामाला मुदतवाढ देण्यात आली असून, अशा प्रकारे नियमबाह्य मुदतवाढ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनात पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याच्या सहापदरीकरणाचे काम ऑक्टोबर २०१० रोजी सुरू झाले. मूळ कंत्राटाप्रमाणे हे काम ३१ मार्च २०१३ पर्यंत संपणे अपेक्षित होते, मात्र काम अद्याप सुरूच आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (एनएचएआय) या कामाला मुदतवाढ देण्याशिवाय काहीही केलेले नाही. अपूर्ण कामामुळे गेल्या ११ वर्षांत या रस्त्यावर शेकडो अपघात झाले. डझनावारी निष्पाप नागरिकांचा बळी गेला. वाहतूक कोंडीमुळे हजारो कोटी रुपयांचे इंधन वाया गेले आणि लक्षावधी नागरिकांचे कोट्यवधी कामाचे तास वाया गेले. मात्र याची खेदखंत ना कंत्राटदाराला ना एनएचएआयला आहे. एनएचएआय दरवर्षी कंत्राटदाराला टोलचे दर मात्र वाढवून देत आहे. एनएचएआयने आजवर कंत्राटदाराला अनेक नोटिसा दिल्या आहेत, पण पुढे कारवाई काहीच केलेली नाही. त्यामुळे या रस्त्यावर अनेक कामे प्रलंबित आहेत. सेवा रस्ता अनेक ठिकाणी अस्तित्वातच नाही आणि जिथे आहे तिथे त्याची अवस्था दयनीय आहे. हा टोल रोड असल्याने या संपूर्ण रस्त्याची देखभाल व दुरुस्ती कंत्राटदाराने करणे अपेक्षित आहे. ज्यावर एनएचएआयने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. मात्र, आज या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. गडकरी यांनी रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा, असे आदेश दिले होते. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे. यामुळे या अपूर्ण कामाचा त्रास सहन करणाऱ्या वाहनचालकांना दिलासा म्हणून काम पूर्ण होईपर्यंत या रस्त्यावरील टोलवसुली स्थगित करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली.