स्मशानात अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:15 AM2021-08-25T04:15:13+5:302021-08-25T04:15:13+5:30
सांगवी : माळशिरस तालुक्यातील बोरगाव (माळवाडी) येथील स्मशानभूमीत प्रेताच्या अंत्यसंस्कारास विरोध करून प्रेताची विटंबना केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संबंधीत ...
सांगवी : माळशिरस तालुक्यातील बोरगाव (माळवाडी) येथील स्मशानभूमीत प्रेताच्या अंत्यसंस्कारास विरोध करून प्रेताची विटंबना केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर संबंधीत व्यक्ती व पोलीस प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई व्हावी अन्यथा आंदोलन व आमरण उपोषणाचा इशारा मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
शुक्रवारी दि.२० रोजी सोलापूर जिल्ह्यातील बोरगाव (माळवाडी) येथील दलित समाजातील माजी सरपंचाच्या भावाचे निधन झाल्यानंतर त्यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीमध्ये घेवून निघाले असता तेथील उच्च जातीतील काही लोकांनी त्याला विरोध केला आणि या रस्त्यावरून जायचे नाही, असे सांगत रस्त्यामध्ये वाहने आडवे लावले. त्यावेळी बाचाबाची होवून सदर प्रेत खाली पडले व प्रेताची हेळसांड होवून विटबंना केली. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी अखेर ग्रामपंचायतीसमोरच प्रेताला अग्नी दिला. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना आहे.
या घटनेनंतर मातंग एकता आंदोलनाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. प्रेत स्मशानभूमीमध्ये दहन करण्यास विरोध दर्शवून प्रेताची विटंबना केल्याने संबंधीत व्यक्ती विरोधात व पोलीस प्रशासनातील दोषी अधिकारी व कर्मचारी यांना त्वरित निलंब करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा मातंग एकता संघटनेच्या वतीने आमरण उपोषण जनक्षोभ तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची आपण गंभीर दखल घ्यावी, असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनवणे, बापूराव बागव, सूरज कूचेकर, राजेंद्र सोनवणे, शिवाजी सोनवणे, संगीता लांडगे, सावळा भिसे, हरिभाऊ चांदणे, भाऊसोा घोलप, बाळासोा तुपे, लालासोा खरात यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २४ सांगवी मातंग समाज निवेदन
फोटो ओळी : मातंग एकता आंदोलनच्या वतीने प्रांत अधिकारी यांना निवेदन देताना.