राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमणांवर कारवाई करा! मोहोळ यांचे पालिका प्रशासनाला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 12:38 PM2024-07-09T12:38:07+5:302024-07-09T12:39:05+5:30
शहरातील रस्त्यांवर अतिक्रमणे झाली असून प्रत्येक १० फुटांवर गाडी आहे, नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत.
पुणे : ‘शहरातील रस्ते आणि पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. अनधिकृत बांधकामेही मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही. कारवाई करताना कोणत्या राजकीय पदाधिकाऱ्याचा फोन केला, तरी त्यांचे ऐकू नका. रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यास प्राधान्य द्या, तत्काळ कारवाई करा,’ असे आदेश सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापलिका प्रशासनाला दिले.
महापालिकेतील विकास प्रकल्पासंदर्भात केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेतली. महापालिका आयुक्त प्रशासक डाॅ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. आदी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे माजी नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. प्रत्येक दहा फुटांवर गाडी आहे. नागरिकांना चालण्यासाठी पदपथ शिल्लक राहिलेले नाहीत. महापालिका अधिकाऱ्यांना वारंवार याची माहिती देऊनसुद्धा कारवाई होत नाही. अशा तक्रारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केल्या. त्यावर मोहोळ म्हणाले, ‘महापालिका क्षेत्रातील रस्ते अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत. ही जबाबदारी महापालिकेची आहे. कोणत्याही अनधिकृत व्यवसाय असू द्या! शहरातील सर्व रस्त्यांचे अतिक्रमण काढले पाहिजे. महापालिका प्रशासनाने यामध्ये टाळाटाळ केलेली अजिबात चालणार नाही.
काही वेळा महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाईला जाण्याच्या अगोदर ज्या ठिकाणी कारवाई होणार आहे, त्या ठिकाणी फोन करून सांगण्यात येते. असे कोणी अधिकारी अथवा कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश मोहोळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले. माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत. पेठांमध्ये काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत. याची माहिती महापालिका प्रशासनाला देऊनसुद्धा कोणतीच कारवाई केली जात नसल्याचे बैठकीत सांगितले. मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला तत्काळ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बैठकीला आले सर्वसाधारण सभेचे स्वरूप
शहरातील अपूर्ण रस्ते, रखडलेल्या पाणीपुरवठा योजना, पुलांची अर्धवट कामे, वाहतूककोंडी यासह विविध प्रश्न माजी नगरसेवकांनी या बैठकीत मांडले. या बैठकीत माजी नगरसेवकांनी तक्रारींचा पाढा वाचण्याची संधी सोडली नसल्याने बैठकीलाही एकप्रकारे सर्वसाधारण सभेचेच स्वरूप प्राप्त झाले होते. या बैठकीला मुख्य सभेचे स्वरूप येण्यास सुरुवात झाल्याने वाॅर्डातील किंवा प्रभागातील समस्या या बैठकीत नकोत. विकास प्रकल्पांचा आढावा घ्यायचा आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना स्पष्ट करावे लागले. मात्र, त्यानंतरही समस्यांचा पाढा वाचणे माजी नगरसेवकांकडून सुरूच राहिले. त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडूनही खुलासाही करण्यात आला. अखेर शहरातील विविध समस्यांसंदर्भातील निवेदने एकत्रित द्यावीत, अशी सूचना मंत्री मोहोळ यांनी केली. नगरसेवकांच्या उपस्थित केलेल्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभेसाठी इच्छुक बैठकीला उपस्थित
शहरातील आमदार विधिमंडळाच्या अधिवेशनासाठी मुंबईत असताना आज महापालिकेत झालेल्या बैठकीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मोहोळ यांच्या बैठकीला हजेरी लावली. प्रत्येकाने आपापल्या विधानसभा मतदारसंघातील समस्या मांडून त्याकडे लक्ष वेधले.