‘विद्या व्हॅॅली’वर कारवाई करा
By admin | Published: November 11, 2015 01:39 AM2015-11-11T01:39:34+5:302015-11-11T01:39:34+5:30
मुळशी तालुक्यातील सूस येथील इंग्रजी माध्यमाच्या विद्या व्हॅली या शाळेवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवारी देण्यात आल्या.
पुणे : मुळशी तालुक्यातील सूस येथील इंग्रजी माध्यमाच्या विद्या व्हॅली या शाळेवर कारवाई करा, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना मंगळवारी देण्यात आल्या.
जिल्हा परिषद शिक्षण मंडळाची आज मासिक आढावा बैठक झाली. या बैैठकीत या शाळेविषयीच्या तक्रारींचा आढावा घेण्यात आला. याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती शुक्राचार्य वांजळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘या शाळेविषयी तेथील स्थानिकांनी काही तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत आम्ही त्यांना विचारणा केली होती, मात्र ते दाद देत नव्हते. त्यांना मुदतही दिली होती. मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे ३० आॅक्टोबरला शिक्षणाधिकारी शाळेवर गेले असता, तेथील संस्थाचालकांनी तुमचा आमचा संबंध नाही, येथे यायचे नाही, असा पवित्रा घेत त्यांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी १०० नंबरवर तक्रार करून हिंजवडी पोलिसांना तेथे बोलाविले. पोलीस तेथे आल्यावर त्यांनी शाळेविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्यावर फाजैदारी दाखल केली आहे.
यानंतर शाळेने अनेक दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न केला. सोमवारी या शाळेचे प्रतिनिधी जिल्हा परिषदेत आले होते. त्यांच्याशी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, मी स्वत: शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख आणि मुळशी तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, पंचायत समिती सभापती रविंद्र कंधारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील चांदेरे, बाळासाहेब चांदेरे यांच्यासमवेत चर्चा करण्यात आली. या वेळी स्थानिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. शाळेच्या प्रतिनिधींनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सर्व बाबी समजावून घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते नरमाईची भूमिका घेत नव्हते. त्यामुळे अखेर अध्यक्षांनी या बैैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांना कारवाई करा, अशा सूचना देत बैैठकीतून निघून गेले.
त्यानंतर आज शिक्षण विभागाची आढावा बैैठक झाली. त्यात अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेनुसार संस्थेच्याबाबत असलेल्या तक्रारींबाबत पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वांजळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)