गृहविभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी; म्हात्रेंच्या व्हिडिओ प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 05:17 PM2023-03-14T17:17:35+5:302023-03-14T17:19:41+5:30
लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे
पुणे : शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक कथित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे ठाकरे गटाचे नेते असून या नेत्यांनी हा व्हिडीओ व्हायरल करायला सांगितल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आहे. अधिवेशनातही या व्हायरल व्हिडिओबाबत टीकाटिपण्णी झाली होती.अशातच महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. म्हात्रे ह्यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करून सांगितले आहे.
चाकणकर म्हणाल्या, शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे. ह्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.राज्यातील महिला लोकप्रतिनिधींना माध्यमांवरून ट्रोल करण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. लोकप्रतिनिधींबाबत जर असे प्रकार होत असतील तर समस्त महिला वर्ग राज्यात सुरक्षित आहेत का हा प्रश्न आहे. महिलांना सायबर सुरक्षा प्रदान करणे हे ही तितकेच महत्वाचे आहे. अशा प्रकरणांमध्ये सायबर गुन्हे विभागाने गांभीर्याने आणि तातडीने कारवाई केल्यास त्याला वेळीच पायबंद होईल. म्हात्रे ह्यांच्या व्हिडिओ प्रकरणी गृह विभागाने योग्य ती कारवाई तात्काळ करावी व यामागील नेमके सत्य समक्ष आणावे.
श्रीमती शीतल म्हात्रे यांच्याबाबतीतचा व्हिडिओ समाज माध्यमांवरून प्रसारित केला जात आहे.ह्या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे.१/२@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@Maha_MahilaAyog@DGPMaharashtra@MahaCyber1
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) March 13, 2023
शीतल म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली टीका
स्त्रीवर बोलायला काही नसले की, तिचे चारित्र्य हनन केले जाते. यापूर्वी घोसाळकर यांनी मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तरी मी ठाम राहिले. तेव्हा मी उद्धव ठाकरेंना याविषयी सांगितले होते. पण त्यांनी ऐकले नाही. मात्र व्हिडीओच्या घटनेनंतर पहिला फोन मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आला. तुझा भाऊ तुझ्या पाठीशी आहे, घाबरू नकोस, असे मुख्यमंत्री म्हणाल्याचेही त्यांनी सांगितले. पायाखालची वाळू सरकरल्यावर माणूस या थराला जातो. असे व्हिडीओ शेअर करून तुमचा पक्ष मोठा होणार का? हे बाळासाहेबांचे संस्कार विसरले आहेत, अशी टीकाही म्हात्रे यांनी केली होती.