काळजी घ्या अन् भरपूर पाणी प्या! राज्यात दाेन महिन्यात उष्माघाताचे ३५६ संशयित रुग्ण
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: April 14, 2023 05:51 PM2023-04-14T17:51:37+5:302023-04-14T17:51:53+5:30
ज्येष्ठ, लहान मुले, गर्भवती माता, मधुमेह, ह्रदयविकाराचे रुग्ण अशा व्यक्तींना उष्माघाताची जाेखीम
पुणे : उन्हाळा लागला की राज्यात उष्माघाताची शक्यता हमखास वाढते. नेहमीप्रमाणे यंदादेखील राज्यात मार्च ते १३ एप्रिल दरम्यान उष्माघाताचे ३५७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक संशयित रुग्ण मुंबई उपनगर, नंदुरबार आणि उस्मानाबाद येथील रुग्णांची संख्या जास्त आहे. तर पुण्यातील दाेन संशयित रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. राज्याच्या साथराेग विभागाने ही माहीती दिली आहे.
यंदा मार्च महिन्यापासूनच राज्यात उष्णता वाढली आहे. राज्यातील सरासरी तापमान ४० अंश सेल्सिअस व त्यापुढे जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्णही वाढले आहेत. राज्यात १ मार्च ते ३१ जुलै दरम्यान उष्माघातांच्या रुग्णांचे सर्वेक्षण केले जाते. एप्रिल महिन्यात पावसाचे प्रमाण वाढलेले असले तरी तात्पुरता दिलासा मिळताे मात्र, उन्हाचा त्रासही हाेताेच. यामध्ये ६५ वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असणा-या व्यक्ती, ० ते ५ वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता, मधुमेह, ह्रदयविकाराचे रुग्ण आणि अतिउष्ण वातावरणामध्ये काम करणा-या व्यक्ती यांना उष्माघाताची जाेखीम आहे.
उष्माघाताची कारणे
- उन्हाळयामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे
- कारखान्यांच्या बॉयलर रुममध्ये काम करणे
- काच कारखान्यातील कामे
- घट्ट कपड्यांचा वापर
लक्षणे
- पुरळ/घामुळया
- उष्णतेने स्नायूमध्ये पेटके येणे
- पाय, घोटा आणि हातांना सूज
- थकवा येणे
- बेशुध्द होणे
प्रतिबंधात्मक उपाय :
- वाढत्या तापमानात कष्टाची कामे करणे टाळावे
- उष्णता शोषूण घेणारे कपडे घालावेत
- भरपूर पाणी प्यावे
- उन्हात जाताना डोके, कान, नाक, डोळे यांचे संरक्षण करावे.
''याबाबत जिल्हा नोडल अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा साथरोग अधिकारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्हा, महापालिका आणि नगरपालिकांमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. जिल्हा स्तरावर उष्माघातामुळे मृत्यू झाल्यास अन्वेषण करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. अशा रुग्णांचा मृत्यू झाल्यावर त्याचा उष्माघातामुळेच मृत्यू झाला आहे का याची अन्वेषन केले जाते. - वरिष्ठ आराेग्य अधिकारी, आराेग्य विभाग''