दिवसभर घरात असणाऱ्या मुलांना सांभाळताना जरा जपून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:14 AM2021-08-27T04:14:30+5:302021-08-27T04:14:30+5:30
मला आपल्या देशातील या नव्याने जगात बाहेर पडू पाहणाऱ्या लहान-लहान बालकांची खूप काळजी वाटली आणि मग हा लेख लिहायला ...
मला आपल्या देशातील या नव्याने जगात बाहेर पडू पाहणाऱ्या लहान-लहान बालकांची खूप काळजी वाटली आणि मग हा लेख लिहायला घेतला.
वर्तन समस्यांवर काम करणे हा माझा पेशा असल्यामुळे मी जेव्हा-जेव्हा समाजात डोकावते, तेव्हा-तेव्हा या वयातील मुलांची खरंच खूप काळजी वाटते. बाळ पोटावर पुढे सरकू लागले ???????? की तो चप्पल-बूट घालून बाहेर जाणाऱ्या माणसाच्या मागे लागते, हे नैसर्गिक आहे. त्याला सांगता येत नाही की मला बाहेर आकाशाखालचे मोकळे जग पाहायचे आहे ते. ते रडून आकांत करते तेव्हा बाहेर जाणाऱ्या व्यक्तीला घरातील कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती सांगते की जरा बाहेर चक्कर मारून आण आणि मग तू जा, असे केले की बाळ शांत होते. हे आपण सगळ्यांनी नक्कीच अनुभवले आहे यात शंकाच नाही. मग आता लॉकडाऊनच्या परिस्थितीत या मुलांचीही गरज कशी पुरी होणार? त्यांच्या दृष्टीने शिकण्याचे माहिती करून घ्यायच्या, ज्ञान मिळवायच्या वयातील प्रक्रिया खंडित पडल्यामुळे आयुष्यभराचे नुकसान होते. समाजात मिसळणे, अनोळखी माणसांबरोबर जमून घेणे, त्यांच्याबरोबर बोलणे हा अनुभवही महत्त्वाचा असतो.
या नवशिक्यांचे खूप जास्त प्रमाणात नुकसान होताना पाहून अस्वस्थ होते आहे. कोंडलेल्या परिस्थितीत ही ५ वर्षांखालच्या वयातील मुले चिडचिड्या स्वभावाची होणार. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया चुकीच्या अर्थाने मजबूत होताना पाहवत नाहीये. त्यांना समजून सांगून कळण्याचे त्यांचे वयच नाही. नैसर्गिकरीत्या या वयात कोणतीही गोष्ट शिकून आत्मसात करायची प्रक्रिया खूप वेगात होत असते, हे आपल्याला माहीत आहे. पालकही कामाच्या ताणामुळे वैतागले आहेत. त्याचा राग मुलांवर निघताना दिसतो आहे. या मुलांनी नेमक्या गोष्टी शिकायचे सोडून भलतेच वातावरणातून शिकतायेत आणि त्याचा त्रास स्वतः पालकच भोगतायेत, असे चित्र समाजात दिसत आहे. या मुलांमध्ये वर्तन समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मुले आता मोठ्यांसारखी बोलताना आढळत आहेत. जोरजोरात बोलणे, मुलांचे उलट उत्तर देणे, हट्टीपणा करणे, नकार न पचवता येणे, अभ्यासात एकाग्रता साधता न येणे, सूचनांचे पालन करताना त्यांना जड जाते आहे.
अजून बरेच काही क्षणभरही शरीर व मन स्थिर ठेवता येत नाही. सुरुवातीच्या काळात मोबाईलवरच्या यूट्यूबवरून पाहून विविध हॉटेलसारखे पदार्थ घरीच बनवण्याचे प्रयोग आईच्या अंगलट आले आहेत. साधे जेवण मुलांना नको वाटत आहे. आहाराचे नखरे वाढून आपणच ठेवले आणि आता त्याचाही त्रास होतो आहे, असे वर्तनातील नुकसान भरून काढायचे म्हणजे या मुलांबरोबर, different किंवा difficult मुलांबरोबर काम जसे intervention म्हणजे वैयक्तिक मुलांबरोबर केले जाते, तसे करणे भाग पडणार की काय असे वाटते आहे. असे केल्यावरच कुठे परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते. त्याचबरोबर पालक समुपदेशनही अत्यंत गरजेचे आहे. खऱ्या अर्थाने आपल्या मुलांचे नुकसान करण्याचा पाया कोरोनाच्या परिस्थितीने घातला आहे, असे म्हणायला हरकत नाही!
--
रचना वनारसे
लेखिका वर्तन विश्लेषक आहेत.