रणरणत्या उन्हात तुमच्या नेत्याचा प्रचार करताना ‘ही घ्या काळजी !’
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 03:15 AM2019-04-01T03:15:56+5:302019-04-01T03:16:34+5:30
याबाबत डॉ़ अविनाश भोंडवे यांनी सांगितले, की दिवसा कोणत्याही वेळी घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी अथवा छत्रीबरोबर ठेवावी़
विवेक भुसे
पुणे : सार्वत्रिक निवडणुकांच्या उमेदवारांची घोषणा होऊन आता सर्वांचा प्रचारही सुरू झाला आहे़ मतदानाला अत्यंत कमी दिवस राहिले असल्याने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार मॉर्निंग वॉकपासून रात्री उशिरापर्यंत पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे फिरत आहे़ त्यांच्याबरोबर त्यांचे कार्यकर्तेही मागोमाग धावताना दिसतात़ राज्यात उन्हाचा पारा ४० च्या पार गेला आहे़ विदर्भात तर त्याने ४३ चा आकडा गाठला आहे़ त्यामुळे अशा रणरणत्या उन्हात प्रचार करायचा तर नेत्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे़ या उमेदवारांबरोबर आता त्यांच्या सौभाग्यवतीही चार भिंतीतून बाहेर पडून प्रचारात हिरीरीने भाग घेत असतात़ त्यांच्यासाठी तर ही आणखीच कठीण वेळ असते़
याबाबत डॉ़ अविनाश भोंडवे यांनी सांगितले, की दिवसा कोणत्याही वेळी घरातून बाहेर पडताना डोक्यावर टोपी अथवा छत्रीबरोबर ठेवावी़ महिला डोक्यावर पदर घेत असतात, पण पुरुष काळजी घेत नाही़ त्यांनी टोपी अवश्य वापरावी़ माणसाने दिवसभरात किमान ३ लिटर पाणी पिणे आवश्यक असते़ उन्हाळ्यात तर अधिक पाण्याची गरज असते़ केवळ पाणीच नाही तर आपल्या शरीराला क्षाराचीही गरज असते़ त्यामुळे पाण्याबरोबरच ताक, कोकम, पन्हे, लिंबूसरबत पिणे श्रेयस्कर ठरेल़ अशा वेळी किती पाणी प्यावे, असा सर्वांनाच प्रश्न पडतो़ या उन्हात तासाला एक ग्लास पाणी शरीरात गेले पाहिजे़ त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या पाण्याच्या बाटल्या हे प्रमाण ठरविण्यासाठी उपयुक्त आहे़ एक लिटरच्या किमान तीन बाटल्या पाणी पिले पाहिजे़
घराबाहेर पडताना सैल, पांढरे कपडे घालावेत़ शक्य असेल तर गॉगल आवश्यक वापरावा़ लोकांना काय वाटेल, यापेक्षा डोळ्यांची काळजी घेणे अधिक आवश्यक आहे़ अशा कडक उन्हात सतत फिरल्यास मोतीबिंदूसारखा आजार होण्याची शक्यता असते़ सर्वात महत्त्वाचे म्हणजे शारीरिक स्वच्छता़ सकाळी अंघोळ केल्यानंतर दिवसभर उन्हात फिरताना घाम खूप येतो़ त्यातून घामोळ्या येण्याचा त्रास अनेकांना होतो़ त्यासाठी आपल्या अवघड जागी टाल्कम पावडरचा वापर नियमित करावा़ घाम आल्याने आपल्या शरीरातील घ्राणेंद्रिय बंद होतात़ घरी आल्यानंतर कोरड्या फडक्याने संपूर्ण अंग पुसून घ्यावे़
प्रचार करताना वाटेत मिळेल ते आणि मिळेल तेथे खाण्याची कार्यकर्त्यांची सवय असते़ ही अनेकदा घातक ठरू शकते़ त्यातून शेवटच्या महत्त्वाच्या दिवसात आजारी पडण्याची शक्यता वाढते़ पूर्वी भेळभत्ता दिला जात असे़ चुरमुरे हे हलके असल्याचे पचायला सोपे असत़ आता वडापाव दिला जातो़ असे तेलकट पदार्थ रोज खाल्ल्याने उलट्या, जुलाब, कावीळ असे आजार उद्भवू शकतात़ टायफॉइडही होऊ शकतो़ त्यामुळे स्वच्छ आणि शक्यतो घराचे जेवण घ्यावे़ फार तिखट, मसालेदार पदार्थ खाऊ नये़
किती गार पाणी प्यावे?
च्उन्हातून आल्यानंतर तहान लागल्याने अनेक जण घटाघटा थंडगार पाणी पिताना दिसतात़ खूप अतिथंड पाणी पिणे टाळावे़ तसेच उन्हातून आल्यानंतर अंगातील घामाचा निचरा होईपर्यंत थांबावे व त्यानंतर थोडे गार पाणी प्यावे़
च्अतिथंड पाणी पिल्याने आपली तहान भागतेच असे नाही़ शिवाय त्यामुळे घसा दुखण्याचा त्रास होऊ शकतो़ त्यामुळे खूप गार पाणी पिण्याचे टाळावे़
च्अशी काही पथ्ये पाळल्यास उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आपल्या आरोग्याची काळजी घेऊन अधिक चांगला प्रचार करू शकतील, असे डॉ़ भोंडवे यांनी सांगितले़
च् दिवसभरात किमान ३ लिटर पाणी प्यावे
च्अतिथंड पाणी पिऊ नये़ पाण्याबरोबरच ताक, लस्सी, कोकम पिणे श्रेयस्कर
च् सैल व पांढरे कपडे वापरावेत़
च्गॉगल अवश्य वापरावा
च्पचायला व हलके अन्न घ्यावे़
च्बाहेरचे तेलकट, अस्वच्छ अन्न टाळावे़ त्याऐवजी घरच्या जेवणाला प्राधान्य द्यावे़