पुणेकरांनो काळजी घ्या, आपल्याला कोरोना विरोधातील मॅच जिंकायची आहे: हरभजन सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 07:31 PM2021-04-24T19:31:19+5:302021-04-24T19:33:18+5:30
फिरत्या कोरोना चाचणी व्हॅन चे उद्घाटन
पुणे : सध्याची परिस्थिती कठीण आहे. एकत्र येऊन आपल्याला यशस्वी लढा देयचा आहे. लवकर निदान व्हावे, म्हणून कोरोनाची टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे उपचार तात्काळ घेता येतील. पुढील धोका आपल्याला टाळता येऊ शकेल. तरच आपल्याला कोरोना विरोधातील मॅच जिंकता येईल. असे मत व्यक्त करून पुणे कोरोना काळजी घ्या. आपल्याला महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा आहे. असे आवाहन प्रसिद्ध क्रिकेटपटू हरभजनसिंग यांनी व्यक्त केले.
भाजपाच्या माध्यमातून पुण्यातील नागरिकांच्या आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजेन चाचण्या करण्यासाठी फिरत्या कोरोना चाचणी व्हॅनचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह महेश करपे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ऑनलाईन कार्यक्रमात हरभजनसिंग बोलत होते.
यावेळी आमदार व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गटनेते गणेश बीडकर , सरचिटणीस गणेश घोष, स्थानिक नगरसेवक योगेश मुळीक, नगरसेविका सुनीता गलांडे व पदाधिकारी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट वेगळी आहे. यावेळी कोरोनाने सर्वांनाच मानसिकदृष्टया हलविले आहे. परमेश्वराने सर्वांना एका पातळीवर आणून ठेवले आहे. जीवन हा एक खेळ आहे, तो खेळायचा आणि जायचे असते. असे प्रवचनात ऐकत होतो. आता मात्र अनुभवतो आहे. कोरोनाच्या टेस्ट केल्याने लवकर निदान समजले तर आपल्याला वेळीच उपचार घेता येतील. कामगार वर्गाला तसेच कर्मचाऱ्यांना टेस्ट करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे लॅब वरील ताण वाढला आहे. कोरोनावर मात करायची असेल तर आपल्याला टेस्ट वाढवाव्या लागतील. त्यामुळे कोरोना चाचणी व्हॅनची संकल्पना राबविण्यात येत आहे. हरभजनसिंग यांनी व्हॅन उपलब्ध करून दिली आहे.
आरटीपीसीआर टेस्ट ही केवळ ५०० रुपयांत केली जाणार असून रिपोर्ट सात तासात मिळणार आहे. तर अँटिजेन टेस्ट २५० रुपयांमध्ये केली जाणार असून रिपोर्ट अवघ्या १५ मिनिटांत मिळणार आहे. त्यामुळे पुढील उपचार घेता येणं शक्य होणार आहे. पुण्यातील मतदारसंघात दोन दोन दिवस ही व्हॅन फिरणार असून दिवसाला आरटीपीसीआरची ६ हजार जणांच्या टेस्ट आणि अँटिजेन टेस्ट १५०० करता येणार आहेत असेही पाटील म्हणाले.
शहराध्यक्ष मुळीक म्हणाले, अंगावर दुखणे काढल्यामुळे काहींना थेट अतिदक्षता विभागात (आयसीयु) दाखल करावे लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे वेळ न घालवता टेस्ट केली तर निदान लवकर समजेल. व्हॅनच्या माध्यमातून जास्तीतजास्त टेस्ट केल्या जाणार आहेत. त्यामुळे धोका टाळण्यासाठी मदत होणार आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने टेस्ट प्रमाण देखील वाढविण्याची गरज आहे.