परदेशी जाण्यासाठी २८ दिवसांत दोन डोस घेणाऱ्यांनो काळजी घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:12+5:302021-06-10T04:08:12+5:30
पुणे : नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाणार असलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी केंद्र शासनाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर ...
पुणे : नोकरी किंवा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाणार असलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांसाठी केंद्र शासनाने नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. या नागरिकांना कोविशिल्डचे दोन डोस २८ दिवसांच्या फरकाने देता येतील, असे नमूद करण्यात आले आहे. मात्र, चार आठवड्यांत दुसरा डोस दिल्यास प्रतिपिंड (अँटिबॉडी) विकसित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे कोरोनापासून पूर्ण संरक्षण मिळू शकणार नाही, असा धोका डॉक्टरांनी वर्तवला आहे.
कोविशिल्डचा दुसरा डोस बारा ते सोळा आठवड्यांनी घेतला तर तो अधिक प्रभावी ठरतो, असे केंद्र सरकारने मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केले. मात्र, परदेशी जाणाऱ्या नागरिकांसाठी ही अट पुन्हा शिथिल करण्यात आली. दुसरा डोस ८४ दिवसांनी घेतल्यास लसीची परिणामकारकता आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले. मात्र, परदेशी जाणाऱ्या नागरिकांना चार ते सहा आठवड्यांत दुसरा डोस दिल्यास अँटिबॉडी विकसित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. त्यामुळे त्यांना कोरोनापासून मिळणारे संरक्षणही कमी होऊ शकते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
भारतातील विद्यार्थी मुख्यतः अमेरिका, युरोप या देशांमध्ये जातात. तेथील अभ्यासक्रम ऑगस्टमध्ये सुरू होतात. त्यानुसार, लसीकरणाचे वेळापत्रक आखावे लागणार आहे.
कोव्हॅक्सिन लस घेतल्यास काय?
कोव्हॅक्सिन लसीला अद्याप जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे परदेशात जाणाऱ्यांनी ही लस घेतली तर त्यांना परदेशात जाण्यासाठी अडचण निर्माण होऊ शकते. दुसऱ्या देशात जाण्यापूर्वी ४८ तास आधी त्यांना आरटीपीसीआर चाचणी केल्याचा अहवाल दाखवावा लागेल. संबंधित देशातील नियमानुसार क्वारंटाइन व्हावे लागू शकते. त्यामुळे परदेशात जाणाऱ्यांना कोविशिल्ड लसच द्यावी, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
चौकट
“दोन डोसमधील अंतर बारा आठवड्यांचे असल्यास अँटिबॉडी दुपटीने वाढतात आणि लसीची परिणामकारकता ९० टक्क्यांपर्यंत पोहचते. केंद्र सरकारच्या सूचनांनुसार, २८ दिवसांनी दुसरा डोस दिल्यास परिणामकारकता १५-२० टक्क्यांनी कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार पहिल्या डोसनंतर ७० टक्के अँटिबॉडी विकसित होतात. दुसऱ्या बूस्टर डोसनंतर हे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत वाढते. त्यामुळे कोरोनापासून पूर्ण संरक्षण मिळवायचे तर दोन डोसमधील अंतर पुरेसे असायला हवे.”
- डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ
चौकट
“कोविशिल्ड लसीचे दोन डोसमधील अंतर कमी करणे वैद्यकीय दृष्टीने योग्य नाही. दोन डोसमध्ये दहा ते बारा आठवड्यांचे अंतर असल्यास लसीची परिणामकारकता वाढत असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ जानेवारीपासून सांगताहेत. आपल्याकडे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण उशिरा सुरू झाले. ते मार्चमध्येच सुरू होणे अपेक्षित होते. त्यानुसार लसीचा दुसरा डोस घेऊन ऑगस्ट महिन्यापर्यंत विद्यार्थी परदेशी जाऊ शकले असते.”
- डॉ. विजय नटराजन, वैद्यकीय संचालक