वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच आरोग्याची काळजी घ्या : अंकुश नाळे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 08:30 PM2020-05-04T20:30:01+5:302020-05-04T20:37:49+5:30
वादळी पावसात किंवा कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात कामे करताना कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी
पुणे: वादळी पावसात राज्यात ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला. कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करून तो पुर्ववत करून दिला. अशी कामे करताना कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले.
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नाळे यांंनी मागील काही दिवसात व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महावितरणचे मंडल, विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयातील सुमारे ११०० अभियंते, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या संवादात मुख्य अभियंता सुनील पावडे (बारामती), अनिल भोसले (कोल्हापूर) व सचिन तालेवार (पुणे) यांचा प्रामुख्याने सहभाग होता.
लॉकडाऊनच्या कालावधीत वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीचे कामे आणि नियोजन याबाबत नाळे यांनी सूचना केल्या. सरकारने जाहीर केलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या रेड झोनमधील सर्व कार्यालयांचे नियमित निर्जंतुकीकरण करणे, कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी व उपाययोजना यासंदर्भातही त्यांनी सांगितले. मानव संसाधन, लेखा व वित्त आदी विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांचे महावितरणच्या 'ऑनलाईन' संगणक प्रणालीद्वारे सध्या घरुनच काम (वर्क फ्रॉम होम) सुरु आहे. त्यांच्याही कामाचा आढावा नाळे यांनी घेतला.
लॉकडाऊनमध्ये वीजग्राहकांनी घरात राहून स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच वीजबिल ऑनलाईनद्वारे जमा करून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन नाळे यांनी केले आहे.