थंडी वाढली, कोमट पाणी, दूध-हळद घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:12 AM2021-02-09T04:12:41+5:302021-02-09T04:12:41+5:30
खोकला, ताप वाढला : श्वसनाच्या आजारात वाढ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे: शहरात गेल्या दोन दिवसांत तापमानात विलक्षण घट झाली ...
खोकला, ताप वाढला : श्वसनाच्या आजारात वाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: शहरात गेल्या दोन दिवसांत तापमानात विलक्षण घट झाली आहे. त्यामुळे थंडीचे प्रमाण वाढले आहे. अचानक बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप याबरोबरच श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ होत आहे. अशा बदलत्या वातावरणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यात हिवाळा कमी होऊ लागतो. उन्हाळा ऋतूची चाहूल लागते. पण आता गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमानात घट होताना दिसत आहे. दिवसभराच्या वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे विविध आजारांना आमंत्रण दिले जात आहे. थंडीमुळे होणारी सर्दी, खोकला, ताप, अशक्तपणा अशा आजाराचे प्रमाण जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने डॉक्टरांशी संवाद साधला.
थंडीत, बदलत्या वातावरणात दमा, अस्थमाचे विकार, वारंवार सर्दी होणे, कफ वाढणे, श्वसनाचे आजार, टॉन्सिल्सचे आजार, घसा दुखणे, ताप, खोकला, अशक्तपणा, संसर्गजन्य आजार, अंगदुखी अशा आजारांचे प्रमाण वाढते.
प्रसिद्ध कान, नाक आणि घसा तज्ज्ञ संदीप करमरकर यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मास्क वापरला जात आहे. त्याचा फायदा झाला आहे. परंतु, वातावरण बदलाने पुन्हा या आजारांची सुरुवात झाली आहे. सध्या कोरोनामुळे अशा आजारांना सामान्य माणूस खूप घाबरत आहे. परंतु घाबरण्याची काही गरज नाही. मास्क बरोबरच कानही झाकले तर उत्तम राहील.
“सर्दी, खोकला या आजारामुळे न्यूमोनियाचे रुग्णही वाढत आहेत. कोविड काळात नागरिक स्वतःची काळजी घेत होते. परंतु आता सर्व काही उघडल्याने काळजी घेऊनही आजारात वाढ होण्याची शक्यता आहे. अचानक वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोमट पाणी पिण्यावर भर द्यावा. थंड हवेत जाणे टाळावे. जीवनसत्त्व ‘क’ आहारात असेल याची काळजी घ्यावी. प्रथिनयुक्त आहाराला प्राधान्य द्यावे. कफ वाढणार नाही याकडे लक्ष द्यावे,” असे उरो रोगतज्ज्ञ डॉ. अपर्णा बिराजदार यांनी सांगितले.
वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चव्हाण यांच्या मते कोमट पाणी, हळद, दूध या गोष्टींबरोबरच पौष्टिक अन्न खावे. भरपूर पाणी पिण्यावर भर द्यावा. कोरोनामुक्त रुग्णांनी घाबरून जाऊ नये. ज्या रुग्णांना छातीचा त्रास झाला होता. त्यांनी सर्दी, खोकला अशा विकारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.