एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षा तातडीने घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:15 AM2021-08-20T04:15:41+5:302021-08-20T04:15:41+5:30
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन वर्षांपासून सरकारी नोकरभरतीवर अप्रत्यक्ष बंदीच ...
पुणे : राज्यात कोरोनाचा प्रकोप सुरू झाल्यापासून बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील दोन वर्षांपासून सरकारी नोकरभरतीवर अप्रत्यक्ष बंदीच सरकारने आणलेली आहे. त्यामुळेच स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली आहे. परीक्षार्थी खूप नैराश्यात आहेत. शासनस्तरावरून म्हणाव्या तशा उपाययोजना केल्या जात नाहीत. राज्य शासनाला आदेश देऊन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करावे. तसेच रखडलेल्या परीक्षा तातडीने घेण्याचे आदेश द्यावेत, अशा मागण्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत.
एमपीएससीच्या गट-क, कृषी सेवा, आणि वन सेवा या २०२० च्या जाहिराती २०२१ संपायला आले तरीही आलेल्या नाहीत. या पदभरती तत्काळ जाहीर करण्यात याव्या. फेब्रुवारी २०२१ ला झालेली आरोग्य भरती आणि इतर सरळसेवा परीक्षांमध्ये, खासगी कंपन्याद्वारा होत असलेला भ्रष्टाचार थांबविण्यासाठी यापुढील गट-क आणि गट-ड पदांच्या सर्व परीक्षा एमपीएससीव्दारे घेण्यात याव्या.
-----
एमपीएससीची सदस्य संख्या वाढवा
मागील दोन वर्षात काेरोनाचे थैमान असताना स्पर्धा परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत आणि नवीन जाहिरातीही आलेल्या नाहीत. त्यामुळे कित्येक विद्यार्थी वय संपल्यामुळे एज बार झालेले आहेत, म्हणून सरसकट सगळ्या परीक्षांच्या वय मर्यादेत दोन वर्षाची सूट जाहीर करावी. एमपीएससीचे वेळापत्रक यूपीएससीप्रमाणे एक वर्षाआधी जाहीर करण्यात यावे. एमपीएससीचे काही सदस्य येणाऱ्या काळात निवृत्त होत आहेत, त्यांची निवड प्रक्रिया आताच सुरू करावी. एमपीएससीवर कार्याचा भार बघता एमपीएससीची एकूण सदस्य संख्या १५ ते २० पर्यंत वाढविण्यात यावी. रखडलेले निकाल लवकरात लवकर लावावेत.
----
धनगर, वंजारी समाजावर अन्याय
पोलीस भरती प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविण्यात यावी. दोन वर्षांपासून रखडलेली शिक्षकपद भरती लवकरात लवकर राबवावी. शालीय आणि महाविद्यालयीन फी कपात १५ टक्के कपात करण्यात यावी. पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी धनगर एनटी-सी व वंजारी एनटी-डी या समाजातील विद्यार्थ्यांना पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जागा वाढून मिळव्यात. २०२० साली जाहीर झालेल्या जाहिरातीत धनगर समाजाला २ जागा व वंजारी समाजाला एकही जागा मिळाली नाही. हा या विद्यार्थ्यांवर अन्याय आहे, असे विद्यार्थी महेश घरबुडे याने सांगितले.