पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या : सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 08:04 PM2019-12-25T20:04:25+5:302019-12-25T20:13:25+5:30
महापरीक्षा पोर्टद्वारे परीक्षा घेवून झालेल्या पोलीस भरतीत गैरप्रकार
पुणे : कायदा सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यात मोठे योगदान देणाऱ्या पोलिसांच्या भरती प्रकियेत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर नियुक्ती झाली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने पोलीस भरती करताना प्रथम मैदानी चाचणी घेवून त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घ्यावी, या मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत मागील सरकारने बदल केला. शारीरिक चाचणीला कमी महत्व देवून लेखा परीक्षेला अधिक महत्त्व दिले. मात्र, त्यामुळे सर्व सामान्य घरातील व ग्रामीण भागातील तरूणांवर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला. माजी उपमुखमंत्री आर. आर. पाटील यांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस भरती केल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील अनेक तरूण-तरूणींना थेट फायदा झाला. त्यामुळे मागील शासनाने घेतलेला निर्णय मागे घ्यावा, असे सुळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
शासनाने पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेप्रमाणे मैदानी चाचणी सुध्दा १०० गुणांची घ्यावी. लेखी परीक्षा महापोर्टलच्या माध्यमातून न घेता मैदानी चाचणीनंतर लगेचच आॅफलाईन पध्दतीने घ्यावी. तसेच भरतीचे वेळापत्रकही वर्षभर आधी जाहिर करावे. तसेच पदांची संख्या वाढवून मेगाभरती करावी, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
पोलिसांवरील जबाबदाºयामध्ये दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. त्यामुळे पोलीस भरतीतून निवडला जाणारा उमेदवार सर्वदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. परंतु, पोलीस भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या या मैदानी चाचणीसाठी केवळ ५० गुण ठेवले आहेत. पोलीस भरतीसाठी अर्ज करणाºया लाखो उमेदवारांची लेखी परीक्षा घेणे सहज शक्य होत नाही. प्रथम शारीरिक चाचणी घेतल्यास लेखी चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या कमी होईल. तसेच शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची राज्याच्या पोलीस दलात नियुक्ती करता येईल. त्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी सुध्दा याबाबत वेळोवेळी आंदोलने केली होती.
--
पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणीचे महत्त्व कमी केले. त्यानंतर महापरीक्षा पोर्टद्वारे परीक्षा घेवून झालेल्या पोलीस भरतीत गैरप्रकार झाले आहे. पोलीस खात्यात सक्षम असणे अपेक्षित आहे. मात्र, शासनाने लेखी परीक्षेला प्राधान्य दिल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. त्यामुळे प्रथम मैदाणी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घ्यावी.
- अविनाश माने, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा
--
शासनाने मैदानी चाचणीतून लांब उडी आणि जोर काढणे वगळे आहे. केवळ गोळाफेक व धावणे हे प्रकार ठेवले आहेत. त्यातून सक्षमता तपासता येत नाही. तसेच या मैदानी चाचणीसाठी उत्तीर्णतेची मर्यादाही ठेवलेली नाही. या निर्णयामुळे पोलीस खात्यात शारीरिकदृष्ट्या असक्षम उमेदवार जाण्याची भिती आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी सुरूवातीला १०० गुणांची मैदानी चाचणी घ्यायला हवी.
- दत्ता सरडे, प्रशिक्षक, मैदानी चाचणी