पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी प्रथम घ्या - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 05:57 AM2019-12-26T05:57:44+5:302019-12-26T05:57:57+5:30
पोलीस दलात सक्षम उमेदवाराची नियुक्ती गरजेची
पुणे : पोलिसांच्या भरती प्रकियेत पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या उमेदवारांची पोलीस पदावर नियुक्ती झाली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने भरती करताना प्रथम मैदानी चाचणी घेऊन पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घ्यावी, अशा मागणीचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत मागील सरकारने बदल केला. शारीरिक चाचणीला कमी महत्त्व देऊन लेखी परीक्षेला अधिक महत्त्व दिले. मात्र, त्यामुळे सर्वसामान्य घरातील व ग्रामीण भागातील तरूणांवर प्रतिकूल परिणाम झाला असून हा निर्णय मागे घ्यावा, असे सुळे यांनी निवेदनात म्हटले आहे. पोलीस भरतीसाठी लेखी परीक्षेप्रमाणे मैदानी चाचणीसुद्धा १०० गुणांची घ्यावी. लेखी परीक्षा महापोर्टलच्यामाध्यमातून न घेता मैदानी चाचणीनंतर लगेचच आॅफलाईन पद्धतीने घ्यावी. भरतीचे वेळापत्रकही वर्षभर आधी जाहीर करावे, आदी मागण्याही सुळे यांनी निवेदनात केल्या आहेत.