ग्रामपंचायतीची सभा स्मारकाऐवजी नव्या इमारतीत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:08 AM2021-06-30T04:08:18+5:302021-06-30T04:08:18+5:30
--- तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ३० जून रोजी घेण्यात येणारी मासिक सभा गावातील हुतात्मा विष्णू ...
---
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीच्यावतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची ३० जून रोजी घेण्यात येणारी मासिक सभा गावातील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारकामध्ये आयोजित करण्यात आली असल्याने पवित्र स्मारक गाव चावडी होत असल्याने मासिक सभा ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीमध्ये घ्यावी, अशी मागणी सात ग्रामपंचायत सदस्यांनी केली असून, सभा स्मारकात झाल्यास बहिष्कार टाकू, असा इशाराही दिला आहे.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मासिक सभा ३० जून रोजी हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक येथे आयोजित करण्यात आलेली आहे, असा ग्रामपंचायतीने अजंठा काढून सर्व सदस्यांना निमंत्रित केले आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला सात सदस्यांनी लेखी निवेदन दिलेले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायतसाठी नवीन प्रशस्त इमारत उभारण्यात आलेली असून, सदर इमारत सध्या धूळ खात पडली आहे. याठिकाणी ग्रामपंचायत सभा घेण्याबाबत आम्ही वारंवार आपणास विनंती करूनही आपण नवीन वास्तूमध्ये सभा घेण्याची टाळाटाळ करीत आहात. ३० जून रोजी होणारी सभा गावातील हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे स्मारक याठिकाणी होणार आहे.
त्यामुळे पवित्र स्मारक हे गाव चावडी होत आहे. त्यामुळे तेथे सभा आयोजिल्यास बहिष्कार टाकू. या निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य आरती भुजबळ, सुरेश भुजबळ, संतोष ढमढेरे, विशाल आल्हाट, कीर्ती गायकवाड, जबीन बागवान, रोहिणी तोडकर यांनी सह्या केल्या आहेत. तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत सदस्यांनी मीटिंगवर बहिष्कार टाकल्याबाबत ग्रामविकास अधिकारी संजय खेडकर यांच्याशी संपर्क साधला असता या विषयाबाबत सरपंच अंकिता भुजबळ निर्णय घेतील, असे सांगितले.