लॉन्ड्री अत्यावश्यक सेवेत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:11 AM2021-04-07T04:11:06+5:302021-04-07T04:11:06+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डॉक्टर, परिचारिकांप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी व पोलीस यंत्रणा या सर्वांना सेवा देणारा लॉन्ड्री व्यवसाय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉक्टर, परिचारिकांप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी व पोलीस यंत्रणा या सर्वांना सेवा देणारा लॉन्ड्री व्यवसाय आहे. दवाखाना, निवासी हॉटेलांमधले कपडे तसेच दैनंदिन वापरातले कपडे ही जीवनावश्यक बाब आहे. त्यामुळे हे कपडे स्वच्छ व इस्त्री करून देणाऱ्या लॉन्ड्री व्यवसायाचा समावेश अत्यावश्यक सेवेत करावा. या व्यवसायास अत्यावश्यक सेवेत घेतल्यास त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे पाच हजार कुटुंबीयांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटेल, अशी मागणी लॉन्ड्री व्यावसायिक संघाचे अध्यक्ष प्रकाश अभ्यंकर यांनी मंगळवारी (दि.६) पत्रकार परिषदेत केली.
यावेळी संघाचे महासचिव अमित जाधव, कार्याध्यक्ष सारंग मसूरकर आणि खजिनदार राहुल राक्षे उपस्थित होते. बंदमुळे लॉन्ड्री व्यवसायातील शेकडो कामगारांचा रोजगार बुडाला आहे. पूर्ण व्यवसायच बंद झाल्याने अनेकांनी पुन्हा गावाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे परवानगी मिळाली नाही व ते कर्मचारी पुन्हा आले नाही तर अनेकांची दुकाने कायमची बंद होतील. शहरातील ९५ टक्के लॉन्ड्री व्यवसाय हा भाड्याने घेतलेल्या दुकानात सुरू आहे. व्यवसाय बंद असल्याने अनेकांचे भाडेदेखील थकले आहे. यातून दिलासा मिळण्यासाठी सरकारने सकारात्मक विचार करावा, अशी मागणी संघाने केली आहे.
कोरोनाचा प्रसार होण्यापूर्वीपासूनच अनेक व्यावसायिक हे घरून कपडे घेत व पुन्हा घरी पोचवत आहेत. त्यामुळे तेथे संपर्क होण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच दुकानात येणाऱ्यांसाठी व्यावसायिक देखील सर्व काळजी घेत आहेत. शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीप्रमाणे लॉन्ड्री व्यावसायिकांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला आहे. यापुढेही नियमांचे पालन करूनच हा व्यवसाय सुरू ठेवला जाईल, अशी मागणी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याचे अभ्यंकर यांनी सांगितले.