सामाजिक कार्याची नोंद घ्यावी
By admin | Published: February 22, 2017 03:19 AM2017-02-22T03:19:06+5:302017-02-22T03:19:06+5:30
समाजात अनेक जण निरलसपणे व नि:स्वार्थीपणे सामाजिक कार्य करीत असतात
पुणे : समाजात अनेक जण निरलसपणे व नि:स्वार्थीपणे सामाजिक कार्य करीत असतात. त्यांची नोंद घेऊन समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन ज्येष्ठ लेखक डॉ. अनिल अवचट यांनी केले.
सुशील माधव न्यासाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात डॉ. अवचट बोलत होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला वंचित व अंध मुलींना नृत्याचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणाऱ्या सायली गुजरला भक्ती-सेवा पुरस्काराने तर संस्कृतच्या प्रसार व संवर्धनासाठी कार्य करणारे चंद्रपूर येथील अॅड. रशीद याकूब शेख यांना संस्कृत साधना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला राधाकांत देशपांडे, आनंद माडगूळकर, मंगला जोशी व्यासपीठावर होते.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. अवचट म्हणाले, ‘‘नादिष्ट व छांदिष्ट मुलांना वेगळ्या वाटेने जाणारी मुले म्हणून समजून घ्यावे.’’
पुरस्काराविषयी आनंद माडगूळकर यांनी माहिती दिली. (प्रतिनिधी)